
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. एका कारमध्ये झालेला हा स्फोट इतका शक्तिशाली होता की 40 फूट खालील जमीनसुद्धा हादरली. स्फोटाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही बाब स्पष्ट दिसून आली. समोर आलेल्या या नवीन व्हिडीओमध्ये स्फोटाचे तीव्र धक्के आणि लोकांमध्ये पसरलेली घबराट स्पष्टपणे दिसून येत आहे. स्फोटानंतरच्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही दृश्ये कैद झाली आहेत. हा मेट्रो स्टेशन पूर्णपणे भूमिगत आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे भूमिगत असलेला मेट्रो स्टेशन परिसर हादरल्याचं पहायला मिळालं. यावरून तो स्फोट किती तीव्रतेचा होता, हे स्पष्ट होतंय.
स्फोट रस्त्यावरील एका कारमध्ये झाला होता, पण त्याचा थेट परिणाम भूमिगत असलेल्या मेट्रो स्टेशनवर झाला. स्फोटाची कंपने इतकी तीव्र होती की भूमिगत मेट्रो स्टेशनवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांमधील पाण्याच्या बाटल्या, पॅकेजेस आणि वस्तू हलू लागले होते. अचानक हादरल्यासारखं जाणवल्याने लोकांच्या चेहऱ्यावरील भीतीसुद्धा या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. त्यानंतर काही सेकंदांनी लोक इथे-तिथे पळू लागतात. कर्मचारीसुद्धा घाबरून बाहेर पळताना दिसत आहेत. सुरुवातीला नेमकं काय घडलं हे न समजल्याने लोक फक्त भीतीने सुरक्षित ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करत होते. पण जेव्हा त्यांना धूर दिसला, तेव्हा ते अधिकच घाबरले. काहींनी कॉल करण्यासाठी त्यांचे फोन बाहेर काढले, तर काही जण सुरक्षित ठिकाणी पळाले.
VIDEO | Delhi: CCTV visuals from inside Lal Quila Metro Station capture moments during the car blast near Red Fort that killed 13 people and injured several others on November 10.
(Source: Third Party)#RedFort #DelhiCarBlast pic.twitter.com/Pmc5S02nYn
— Press Trust of India (@PTI_News) November 15, 2025
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन पूर्णपणे भूमिगत आहे आणि स्फोट त्याच्या अगदी वर झाला. यामुळे स्फोटाची कंपने थेट खाली पोहोचली. जेव्हा स्फोट अधिक तीव्रतेचा असतो तेव्हाच जमिनीवर खोलवर अशी कंपने जाणवतात. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून फॉरेन्सिक पथकं स्फोटाची चौकशी करत आहेत. या स्फोटाचं स्वरुप, त्यात वापरलेली स्फोटके आणि त्यामागे कोणाचा हात असावा, याचा तपास दिल्ली पोलीस आणि स्पेशल सेल करत आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.