Delimitation Bill : फॅमिली प्लानिंग करणाऱ्यांना कमी जागा, जावेद अख्तर यांनी फटकारलं
मोदी सरकारच्या डीलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. जावेद अख्तर यांनी फॅमिली प्लानिंग न करणाऱ्यांना अधिक जागा देण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इंडिया आघाडीने एससी-एसटीच्या हिताला धक्का लागेल म्हणत विधेयकाला विरोध दर्शवला आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधेयकास पाठिंबा देत इंडिया आघाडीला धक्का दिला आहे.

मोदी सरकारने संसदेत डीलिमिटेशन विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आणि एमके स्टॅलिन यांच्या डीएमकेने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारचं पारडं जड झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया आली आहे. ज्या लोकांनी फॅमिली प्लानिंगसाठी प्राधान्य दिलं नाही त्यांना अधिक जागा दिल्या जात आहे, असं सांगतानाच कोणता पक्ष या विधेयकाला पाठिंबा देतो आणि कोणता विरोध करतो, यावर माझं लक्ष आहे, असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं.
पहिली गोष्ट म्हणजे फायनल प्लान अजून समोर आला नाही. हे विधेयक कसं लागू केलं जाणार? नवीन मतदार संघ बनवले जाणार का? कोणत्या क्रायटेरियावर विचार केला जाणार आणि देशाला विविध मतदारसंघात कसं विभागलं जाणार? हे पाहावं लागणार आहे. दुसरं म्हणजे, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, ज्या लोकांनी फॅमिली प्लानिंगकडे लक्ष दिलं नाही, त्यांना ज्यादा जागा दिल्या जात आहेत. ज्या भागातील लोकांनी फॅमिली प्लानिंग केलं त्यांना कमी जागा दिल्या जात आहेत. त्यामुळे बॅलन्स कसं साधलं जाणार आहे? या सर्वांची डिटेल्स आल्यावर आम्ही पाहू, असं जावेद अख्तर म्हणाले. केंद्रातील सरकार व्यतिरिक्त विरोधी पक्षातील कोण कोण सदस्य या विधेयकाला पाठिंबा देणार आणि कोण हे विधेयक नाकारणार हे पाहावं लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
इंडिया आघाडीचा विरोध
दरम्यान, इंडिया आघाडीने डीलिमेटशन विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. आज इंडिया आघाडीची बैठक झाली. तब्बल तासभर ही बैठक चालली. या बैठकीला 11 पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या विधेयकातून एससी, एसटीच्या हिताचं लक्ष दिलं गेलं नाही. हे विधेयक एससी आणि एसटीच्या विरोधातील आहे. या विधेयकाच्या माध्यमातून मनुस्मृती आणायची आहे. विधेयक आणल्यानंतर ते संविधान हटवतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
शरद पवारांचा पाठिंबा
दरम्यान, इँडिया आघाडीतील सर्वात महत्त्वाचा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीलाही पवार गटाने दांडी मारली. त्यामुळे इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पवारांच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. शरद पवार हे पाठीत खंजीर खुपसतात. तसा त्यांचा इतिहास आहे. जिकडे सत्ता असते तिकडे राष्ट्रवादी जाते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.