Pudina Anardana Chutney Recipe: प्रत्येक घासात ताजेपणा: समोसे आणि सँडविचसाठी परफेक्ट पुदिना-डाळिंबाची चटणी
Pudina Anardana Chutney Recipe: भारतीय खाद्यसंस्कृतीत चटणीची चव काहीतरी वेगळीच असते. समोसे, पकोडे किंवा रोजच्या जेवणासोबत चटणी खाल्ल्यास खाण्याचा आनंद वाढतो. आज आपण पुदिना आणि डाळिंबाच्या दाण्यांची चटणी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी चटणी असेल, तर जेवणाची चव आणखी वाढते. हिरवी चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी आपण नेहमीच खातो. मात्र, यावेळी काहीतरी वेगळे आणि चविष्ट करून पाहायचे असेल, तर पुदिना आणि डाळिंबाच्या दाण्यांची चटणी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पुदिन्याचा ताजेपणा, हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि डाळिंबाच्या दाण्यांचा आंबटपणा यामुळे या चटणीला एक खास चव मिळते. विशेष म्हणजे, ही चटणी बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही.
चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पुदिना-डाळिंबाची चटणी तयार करण्यासाठी एक वाटी ताजी पुदिन्याची पाने, अर्धी वाटी हिरवी कोथिंबीर, सुके डाळिंबाचे दाणे, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, चार ते पाच लसूण पाकळ्या, एक छोटा कांदा, चवीनुसार मीठ, काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळी मिरी आणि थोडासा गूळ घ्यावा.
बनवण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम पुदिना आणि कोथिंबिरीची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्यानंतर खलबत्त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगल्या ठेचून घ्याव्यात. यामुळे लसूण आणि मिरचीचा स्वाद चटणीत छान मिसळतो. आता त्यात पुदिन्याची पाने, हिरवी कोथिंबीर, सुके डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. हे सर्व साहित्य एकत्र करून चांगले वाटून घ्यावे. चटणी आवडीनुसार जाडसर किंवा बारीक ठेवता येते.
यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळी मिरी आणि थोडासा गूळ घालावा. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. अशा प्रकारे काही मिनिटांतच चविष्ट पुदिना-डाळिंबाची चटणी तयार होते.
कोणत्या पदार्थांसोबत खाऊ शकता?
ही चटणी गरमागरम समोसे, कुरकुरीत पकोडे, आलू टिक्की आणि विविध प्रकारच्या चाटसोबत अतिशय स्वादिष्ट लागते. याशिवाय सँडविचमध्येही या चटणीचा वापर करता येतो. पाहुण्यांसाठी नाश्ता तयार करताना ही चटणी दिल्यास पदार्थांची चव आणखी खुलते. पुदिन्याचा सुगंध, डाळिंबाच्या दाण्यांचा आंबटपणा आणि गुळाची हलकी गोडी यांचा सुंदर मिलाफ असलेली ही चटणी नेहमीच्या हिरव्या चटणीपेक्षा नक्कीच वेगळी ठरते. त्यामुळे घरच्या घरी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी एकदा नक्की करून पाहा…
