
देशभरातील लोक दिवाळीची वाट पाहत आहेत. खासकरून शहरातील लोक दिवाळीला गावी जातात. यातील बहुतांशी लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यात प्रवाशांना प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ सोबत न ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणताही अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी ही विनंती केली आहे. रेल्वे प्रवासात कोणते पदार्थ सोबत नेण्यास मनाई करण्यात आली आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
रेल्वे प्रशासनाने प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी 6 वस्तूंवर प्रवासादरम्यान बंदी घातली आहे. यात फटाके, रॉकेल, गॅस सिलिंडर, स्टोव्ह किंवा गॅस शेगडी, आगपेटी आणि सिगारेट या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तूंमुळे स्फोट होण्याचा किंवा आग लागण्याचा घोका असतो. प्रवासादरम्यान असणारी गर्दी, कमी जागा यामुळे एक ठिणगीही आग पेटवू शकते, अशावेळी या वस्तू ट्रेनमध्ये असल्यास स्फोटाचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
दरवर्षी दिवाळीला रेल्वेत मोठी गर्दी पहायला मिळते. अनेकदा फॅमिलीसोबत प्रवास करणारे लोक बॅगा आणि सामानासह प्रवास करतात. यंदाही दिवाळीला अशीच गर्दी पहायला मिळण्याची शक्यता आहे. स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी दिल्ली, मुंबई, पटना अशा स्थानकांवर अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी मर्यादित राहण्यास मदत मिळणार आहे.