
भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण सार्वजनिक ठिकाणी रील बनवत बनवत असतात. रेल्वे स्टेशन, रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे डब्यांमध्येही धोकादायक पद्धतीने रील्स बनवल्या जात आहेत. अनेकजण जीव धोक्यात घालून रील बनवतात. त्यामुळे आता रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता रील बनवताना दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येकजण मोबाईल फोनमध्ये बुडालेला आहे. बरेच तरुण रुग्णालये, मंदिरे, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शॉपिंग मॉल आणि सिनेमा हॉल अशा ठिकाणी रील्स बनवतात. यामुळे नागरिकांना त्रासाचाही सामना करावा लागतो. बरेच तरुण रीलसाठी ट्रेन रुळावर येण्यापूर्वी जवळून व्हिडिओ बनवणे, रुळांवर चालणे, लाईक्स मिळविण्यासाठी रुळांवर झोपणे आणि चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारणे असी कृत्ये करतात.
समोर आलेल्या माहितीनुसीर काही महिन्यांपूर्वी चेन्नईजवळ रील्स काढण्याच्या नादात एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी रेल्वे स्टेशनवरील नियम कडक करण्याची मागणी केली होती. आता रेल्वे अधिकाऱ्यांनी स्टेशनवर व्हिडिओ बनवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धोकादायक पद्धतीने रील बनवणे कमी होईल अशी रेल्वे प्रशासनाला आशा आहे.
सीसीटीव्ही द्वारे नजर
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांवर व्हिडिओ रेकॉर्डिंगला परवानगी नसते. मात्र रील्सच्या क्रेझमुळे बरेच लोक व्हिडिओ काढतात आणि तो पोस्ट करत आहेत. मात्र आता रेल्वे स्टेशनवर आणि ट्रॅकवर व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे बारीक लक्ष ठेवले जात आहे.
1 हजार रुपयांचा दंड
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एखादा व्यक्ती धोकादायक पद्धतीवे व्हिडिओ बनवताना सापडला तर त्याला किमान 1000 रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच जर एखादा व्यक्ती रेल्वेच्या डब्यातून उडी मारताना किंवा धोकादायक पद्धतीने खाली उतरताना इतरांना धोका निर्माण होत असेल तर त्याला अटक केली जाणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.