
आपण सर्वसामान्य लोक आठवड्याला एखादी सुट्टी घेऊन थोडी विश्रांती घेतो. रविवार किंवा इतर सुट्ट्यांमध्ये कामाचा ताण थोडा हलका करतो. पण देशाच्या सर्वोच्च पदांवर बसलेले लोक – म्हणजेच राष्ट्रपती आणि पंतप्रधान – यांचं काय? त्यांनाही सुट्टी मिळते का?
राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यांना मोठा पगार, भव्य राष्ट्रपती भवन, खास सुरक्षा आणि इतर अनेक सवलती मिळतात. पण त्यांच्यासाठी ठराविक सुट्ट्या नसतात. जरी ते विश्रांतीसाठी ‘राष्ट्रपती निलायम’ (हैदराबाद) किंवा ‘रिट्रीट बिल्डिंग’ (शिमला) येथे जातात, तरी तिथूनही त्यांचं काम सुरूच राहतं. म्हणजेच राष्ट्रपती हे 24 तास, 365 दिवस देशासाठी सज्ज असतात.
दुसरीकडे, पंतप्रधान हे देशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. देशातली प्रत्येक मोठी योजना, धोरण, निर्णय यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या असतात की त्यांना वेळेचं किंवा दिवसभराचं बंधन लागू होत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनेकदा सांगितलं जातं की त्यांनी 2014 पासून एकही सुट्टी घेतलेली नाही. आरटीआयच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं की, पंतप्रधानांसाठी कोणतीही अधिकृत सुट्टीची तरतूद नाही.
याचा अर्थ, देशाचे हे दोन्ही सर्वोच्च पद भूषवणारे व्यक्तीमत्व कधीही “ऑफ ड्युटी” नसतात. सुट्टी म्हणजे केवळ स्थान बदलणं – पण काम नेहमीच सुरू असतं. हा त्यांचा कर्तव्यदक्षतेचा आदर्श आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक ठरतो.
राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत देशाचे उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचे कार्यालय पाहतात. Vicepresidentofindia.nic.in वर मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा राष्ट्रपती आजारपणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव कार्यभार स्वीकारण्याच्या स्थितीत नसतात, तेव्हा अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती त्यांचे कार्यभार संभाळतात.
दुसरीकडे, भारताच्या पंतप्रधानांचा मृत्यू, राजीनामा, बडतर्फी किंवा इतर कारणांमुळे पंतप्रधान पदाची जागा रिक्त झाल्यास, नवीन पंतप्रधान निवड होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. जर, भारताचे पंतप्रधान आजारी असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते त्यांचे काम करू शकत नसतील, तर ते पदाचा कार्यभार पक्षाच्या दुसऱ्या सदस्याला देऊ शकतात.