Doctors Strike : देशभरातील डॉक्टर रस्त्यावर, बंगालमध्ये 4 दिवसांपासून संप, 28 रुग्णांचा मृत्यू

विविध राज्यातील डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. महाराष्ट्रातील 7 हजार डॉक्टरांनी एक दिवसीय संप करुन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Doctors Strike : देशभरातील डॉक्टर रस्त्यावर, बंगालमध्ये 4 दिवसांपासून संप, 28 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणप्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. विविध राज्यातील डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. महाराष्ट्रातील 7 हजार डॉक्टरांनी एक दिवसीय संप करुन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुंबई, पुणे, नागपूरमधील निवासी डॉक्टरांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल आणि ओपीडी आज बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होणार हे निश्चित आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून प. बंगालमध्ये डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. यादरम्यान 28 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालमधील सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली होती. 10 जून रोजी संध्याकाळी साडेपाच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला. मात्र तरीही डॉक्टरांनी संप सुरुच ठेवला. त्या संपाला दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी समर्थन दिलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पुकारुन पाठिंबा दिला.

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, केरळ, बिहार, पंजाब या राज्यातील डॉक्टरांनीही कामबंद आंदोलन सुरु केलं. देशातील अनेक शहरांमध्ये डॉक्टर रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत. “जीव वाचवणाऱ्यांना वाचवा”, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा घोषणा डॉक्टरांनी दिल्या.


नेमकं घडलं काय?

10 जून रोजी साडेपाचच्या सुमारास बंगालमधील नील रत्न सरकार (NRS) मेडिकल कॉलेजमधील एका 75 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ केला. त्यावेळी शिवीगाळ करणाऱ्या नातेवाईकांनी माफी न मागितल्यास मृत्यूचं प्रमाणपत्र देणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी झटापट सुरु झाली. काही वेळाने एका समुहाने हत्यांरासह मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन ज्युनिअर डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले.

या प्रकरणानंतर डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं. 11 जूनपासून बंगालमधील डॉक्टरांनी संप सुरु केला. त्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना गुरुवारी दुपारपर्यंत कामावर रुजू होण्यास बजावलं होतं. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या या निर्णयाने डॉक्टर आणखी संतापले. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत भाष्य न करता थेट कारवाईचा इशारा दिल्याने डॉक्टर आक्रमक झाले.

दुसरीकडे ममतांनी भाजप आणि सीपीएमवर डॉक्टरांना भडकवल्याचा आरोप केला. तसंच या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात असल्याचा आरोपही केला. बंगालमध्ये डॉक्टरांच्या संपामुळे अनेक सरकारी रुग्णालयात आपत्कालिन विभागाव्यतिरिक्त अन्य सेवा बंद आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *