
अमेरिकेकडून वारंवार भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा मोठा फटका हा भारताला सध्या बसत आहे, तर दुसरीकडे चीनने अमेरिकेला मोठा दणका दिला होता, चीनने अमेरिकेकडून सुरू असलेली सोयाबीनची खरेदी अचानक थांबवली, त्यानंतर चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आता शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा अमेरिकेचा मोठा निर्णय मानला जात आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जग त्रस्त असताना आता अमेरिकेनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट फटका हा भारताला बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं इराणची आर्थिक रसद तोडण्यासाठी आता मोठा निर्णय घेतला असून, इराणचे सर्व व्यापारी मार्ग अमेरिकेकडून बंद करण्यात आले आहेत. अमेरिकेकडून यापूर्वीच इराणवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत, त्यातच आता इराणसोबत पेट्रोलियम व्यापर करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध लावण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. या संदर्भात अमेरिकेनं एक आदेश जारी केला आहे, या नव्या आदेशानुसार ट्रम्प प्रशासनाने 50 पेक्षा जास्त संस्था आणि व्यक्तींवर प्रतिबंध लावला आहे, अमेरिकेनं ज्या कंपन्यांवर प्रतिबंध घातला आहे, त्या सर्व कंपन्या या इराणसोबत पेट्रोलियम व्यावसायात सक्रिय आहेत, आणि या कंपन्या इराणला पेट्रोलियम पदार्थ विक्रीसाठी मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
अमेरिकेनं ज्या कंपन्यांवर प्रतिबंध घातले आहेत, त्या कंपन्या भारत, चीन, पनामा या देशांशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे आता याचा थेट फटका हा भारताला देखील बसणार आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाकडून यासंदर्भात एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे, की ज्या कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्या कंपन्यांनी मागील काही महिन्यांमध्ये इराणला व्यापारात मोठी मदत केली आहे. या कंपन्यामुळे इराणला तेलाची निर्यात शक्य झाली.
भारताला धक्का
अमेरिकेकडून इराणच्या पेट्रोलियम व्यापारात सहभागी असलेल्या सहा भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. 2024 मध्ये इराणने चीनला जवळपास चार मिलियन बॅरलच्या आसपास कच्च्या तेलाची निर्यात केली आहे. मात्र आता अमेरिकेनं घातलेल्या या प्रतिबंधामुळे इराणसोबतच चीन आणि भारताला देखील त्याचा मोठा फटका बसणार आहे.