
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात होणारं स्थलांतर रोखण्यासाठी तसेच अमेरिकेतली अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आता अमेरिकेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. ट्रम्प प्रशासनानं यापूर्वीच H1B व्हिसा आणि इतर प्रकारच्या व्हिसांबद्दल काही कडक नियम लागू केले आहेत. ज्यामध्ये एच 1बी व्हिसाच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली, ज्याचा थेट मोठा परिणाम हा भारतीयांवर झाला. कारण जगातील जेवढे नागरिक अमेरिकेत आहेत, त्यातील 70 टक्के संख्या ही भारताची आहे. तसेच व्हिसा देण्यासाठी आता सोशल मीडिया खात्यांची देखील कडक तपासणी केली जाणार आहे. जर सोशल मीडिया अकाऊंटवर अमेरिकेविरोधात एकही पोस्ट असेल तरी देखील तुमचा व्हिसा नव्या नियमांतर्गत रद्द होण्याची शक्यता आहे.
एवढंच नाही तर ज्या गर्भवती महिला आहेत, आणि आपल्या मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्या आपल्या मुलाला अमेरिकेमध्ये जन्माला घालू इच्छितात, त्याचे व्हिसा देखील रद्द करण्यात येणार आहेत, दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता अमेरिकेनं ग्रीन कार्ड व्हिसाबाबत देखील मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे जे अमेरिकन नागरिक नाहीत आणि ग्रीन कार्ड व्हिसाधारक आहेत, त्यांची आता अमेरिकेत येताना आणि अमेरिकेतून जाताना नोंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी खास बायोमॅट्रिक सिस्टिम आणि फिंगर प्रिंटचा वापर केला जाणार आहे. 19 देशातील ग्रीन कार्ड व्हिसाधारकांवर करडी नजर असणार आहे, ज्यामध्ये भारताच्या शेजारील दोन देश म्यानमार आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.
भारतावर काय परिणाम?
अमेरिकेच्या या नव्या व्हिसा पॉलिसीचा भारतावर फार काही परिणाम होणार नाही, अमेरिकेमध्ये मोठ्या संख्येनं ग्रीक कार्ड व्हिसा धारक भारतीय नागरिक आहेत. परंतु त्यामुळे एवढा काही फरक पडणार नाही, फक्त नियम कठोर झाल्यामुळे अमेरिकेतून बाहेर पडताना आणि अमेरिकेत पुन्हा एन्ट्री करतानाची प्रक्रिया आता अधिक जटिल बनणार आहे, प्रत्येकवेळी कडक तपासणी केली जाणार आहे.