डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या विमानतळावर घोर अपमान, शी जिनपिंग अमेरिकेच्या राष्ट्रपतींसोबत असं का वागले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. ते बिजिंगच्या विमानतळावर पोहोचले, मात्र तिथे जे घडलं त्यामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांचा मोठा अपमान झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय चीनच्या दौऱ्यावर आहेत. ते बुधवारी बिजिंग विमानतळावर दाखल झाले. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी विमानतळावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आले नाहीत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उपराष्ट्रपती हान झेंग यांना पाठवलं होतं. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआच्या एका रिपोर्टनुसार बिजिंगच्या एअरपोर्टवर चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं. यावेळी हान झेंग यांच्यासोबत अमेरिकेचे चीनमधील राजदूत डेविड पर्ड्यू अमेरिकेमधील चीनचे राजदूत शी फेंग आणि चीनच्या परराष्ट्र विभागाशी संबंधित कार्यकारी उपमंत्री मा झाओक्सू यांची देखील उपस्थिती होती.
या व्यतिरिक्त चीनने डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पांढऱ्या आणि निळ्या गणवेशातील तब्बल 300 तरुणांना विमानतळावर तैनात केलं होतं. एक बँड पार्टी देखील उपस्थिती होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी यूएई, इस्त्रायल, साऊदी अरेबिया, कतार या सारख्या अनेक देशांचा दौरा केला. या देशांमध्ये तेथील राष्ट्रपतींनी विमान तळावर येऊन डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं होतं. मात्र चीनमध्ये तसं घडलं नाही. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे ट्रम्प यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आले नाहीत. त्यामुळे जगभरात चर्चेला उधाण आलं आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांचा यासाठी देखील अमपान मानला जात आहे, कारण चीनच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं मोठं कौतुक केलं होतं, मात्र आता चीनचे राष्ट्रपती त्यांच्या स्वागतासाठी देखील विमानतळावर आले नाहीत.
जिनपिंग विमानतळावर का गेले नाहीत?
साउथ चायना मॉर्निग पोस्टनुसार चीनमधील प्रोटोकॉलनुसार कोणत्याही देशाच्या राष्ट्रपतीचं स्वागत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रीच जातात. मागच्यावेळी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत परराष्ट्र मंत्रालयाकडूनच करण्यात आलं होतं. मात्र डोनाल्ड ट्रम्प स्वागताने खुश व्हावेत यासाठी यावेळी शी जिनपिंग यांनी उपराष्ट्रपतींना देखील विमानतळावर पाठवलं होतं. शी जिनपिंग हे कधीही कोणाच्या स्वागतासाठी विमानतळावर जात नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी व्लादीमीर पुतिन आणि किम जोंग ऊन यांनी देखील चीनचा दौरा केला होता, त्यावेळी देखील स्वत: जिनपिंग हे विमानतळावर गेले नव्हते. त्यामुळे ते यावेळी देखील ट्रम्प यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले नाहीत. 2009 साठी शेवटचं शी जिनपिंग यांना विमानतळावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं स्वागत करताना पाहिलं गेलं होतं. परंतु त्यावेळी ते उपराष्ट्रपती होते. त्यावेळी त्यांनी बराक ओबामा यांचं स्वागत केलं होतं.