
भारतात जुन्या काळापासून शाही विवाह करण्याची परंपरा आहे. सध्याच्या काळातही अनेक शाही विवाहसोहळे संपन्न होत आहेत. अशातच आता कानपूरमधील निलंबित पोलीस अधिकारी डीएसपी ऋषिकांत शुक्ला हे आपल्या मुलाच्या शाही लग्नामुळे अडचणीत आले आहेत. या लग्नामुळे त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्ला यांच्याकडे उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त संपत्ती आहे याची चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.
मार्चमध्ये कानपूरच्या एटर्निटी रिसॉर्टमध्ये शुक्ला यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. या रिसॉर्टची किंमत 200 ते 250 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. या लग्नाला आमदार, खासदार आणि सुमारे भाजपचे 18 जिल्ह्यांचे अध्यक्षांसह आसपासच्या भागातील अनेक प्रमुख राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शेजारील एका जिल्ह्याचे तत्कालीन एसपी, डीआयजी दर्जाचे अधिकारी आणि एडीजी देखील उपस्थित होते.
ऋषिकांत शुक्ला यांनी 28 वर्षे नोकरी केली. त्यांनी 8 वर्षे उपनिरीक्षक, 3 वर्षे निरीक्षक आणि 17 वर्षे डीएसपी म्हणून काम केले. त्यांनी अनेक ठिकाणी ही सेवा दिली. या काळात त्यांनी मोठी संपत्ती जमवली. एसआयटीच्या अहवालानुसार, शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबाकडे 100 कोटींची मालमत्ता आहे. यात आर्य नगर परिसरात 11 दुकाने, आर नगरमधील चार मजली इमारत, एक गेस्ट हाऊस, रिअल इस्टेट आणि अनेक कंपन्यांमधील हिस्सेदारीही आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ऋषिकांत शुक्ला यांनी लग्नातील खर्चाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, माझ्या मुलाचे लग्न होते. मुलीच्या कुटुंबाने लग्नाची व्यवस्था केली होती. जर त्यांनी स्वतःच्या इच्छेने 200 कोटींचे रिसॉर्ट निवडले तर मी कसा नकार देऊ शकतो? मी या रिसॉर्टसाठी एकही पैसा खर्च केला नाही.’ शुक्ला यांच्या या विधानानंतर अनेकांनी म्हटले आहे की, लग्नाचा खर्च मुलीकडील लोकांनी केली मग मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि राजकारणी उपस्थित का होते?
ऋषिकांत शुक्ला यांच्या मुलाच्या संपूर्ण लग्नाची चौकशी सुरू झाली आहे. या लग्नासाठी निधी कोणी दिला आणि कोणतेही बेनामी व्यवहार झाले का याची चौकशी केली जात आहे. लग्नासाठी रिसॉर्ट बुकिंग, सजावट, पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था आणि केटरिंगवर कोट्यवधी रुपये खर्च झाला होता. आता तपास संस्था या लग्नाशी संबंधित खर्चाची माहिती जमवताना दिसत आहेत.