
LPG Shortage : भारतापासून हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. परंतु या युद्धाची झळ भारताला बसायला लागली आहे. भारताच्या जवळजळव प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा? असा सवाल उपस्थित केला जातोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी फक्त कुटुंबंच नव्हे तर हॉटेल, रेस्टॉरंट्स, कॅन्टीवरही त्याचा परिणाम झाला आहे. वेगवेगळे पदार्थ तयार करायला गॅसच नसल्याने हॉटेल, कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ कमी करण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयापासून ते मुंबईत हॉटेल्सपर्यंत यातून कोणीही सुटलेले नाही. दिल्ली उच्च न्यायालयातील कॅन्टीनमध्ये तर बिर्याणी, दाल मखनी, शाही पनीर यासारखे पदार्थ मिळणे बंद झाले आहे.
गॅस सिलिंडरच्या कमतरतेचा फटका देशभरातील कॅन्टीन, हॉटेल्सना बसला आहे. देशातील साधारण 90 टक्के रेस्टॉरंट हे एलपीजी गॅस सिलिंडच्या मदतीने खाद्यपदार्थ तयार करतात. परंतु आता गॅस सिलिंडरच उपलब्ध नसल्याने वेगवेगळे मेन्यू असणारे खाद्यपदार्थ तयार तरी कसे करावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता अनेक रेस्टॉरंट्समध्ये गॅस सिलिंडरच्या मदतीने तयार केले जाणारे पदार्थच मेन्यूमधून हटवून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी तंदुरी चिकन, पनीर टिक्का, नान, तंदूर असे पदार्थ मात्र अजूनही रेस्टॉरंटमध्ये मिळत आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयातील कॅन्टीनमध्ये सर्व वकील जेवणाचा आस्वाद घेतात. परंतु एलपीजीच्या कमतरतेमुळे तिथेही बिर्याणी, दाल मखनी, शाही पनीर यासारखे मेन कोर्स खाद्यपदार्थ मेन्यूमधून हटवण्यात आले आहेत. कॅन्टीनतर्फे तसे निवेदनच जारी करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर साधा समोसादेखील तिथे मिळत नाहीये.
दरम्यान, आता हे खाद्यपदार्थच खायला मिळत नसल्याने आता नेमकं काय करावं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे एलपीजीच्या कमतरतेमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.