माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन

Shri Prakash Jaiswal Death News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन झाले आहे. ते कानपूरमधून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. तसेच त्यांनी 10 वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन
Shri prakash jaiswal
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 10:03 PM

राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी आली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन झाले आहे. कानपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते कानपूरमधून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. तसेच त्यांनी 10 वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. पोखरपूर येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली.

श्रीप्रकाश जयस्वाल यांनी कानपूरमध्ये काँग्रेसला बळ दिले, तसेच कानपूरमध्ये अनेक मोठे प्रकल्प आणले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जयस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला. योगी म्हणाले की, ‘माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! मी प्रभू श्री राम यांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि शोकाकुल कुटुंबाला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी.”

महापौर म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात

श्रीप्रकाश जयस्वाल यांचा जन्म कानपूर मध्ये झाला होता. 1967 साली त्यांनी माया राणी जयस्वाल यांच्याशी लग्न केले. श्रीप्रकाश यांना दोन मुले आणि एक मुलगी आहेत. जयस्वाल 1989 मध्ये कानपूर शहराचा महापौर म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. कालांतराने ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. 2000 ते 2002 ते उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी पक्षाचा विस्तार करण्याचे काम केले.

UPA 1 आणि 2 कार्यकाळात मंत्री

2004 साली स्थापन झालेल्या UPA 1 सरकारमध्ये श्रीप्रकाश जयस्वाल यांच्याकडे गृह राज्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. 23 मे 2004 ते 22 मे 2009 या काळात ते या पदावर होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी अंतर्गत सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था आणि गृह मंत्रालयाशी संबंधित इतरही जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर 19 जानेवारी 2011 ते 26 मे 2014 पर्यंत युपीए 2 च्या काळात ते कोळसा मंत्री होते. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.