धक्कादायक! सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगचा गंभीर इशारा

हरियाणातील डबवालीमधील सावंतखेडा या गावात सिद्धू मूसेवालाचा एक पुतळा आहे. या पुतळ्यावर काही लोकांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पुतळ्याची उभारणी जननायक जनता पार्टी म्हणजेच जेजेपी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिग्विजय चौटाला यांनी केली होती.

धक्कादायक! सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगचा गंभीर इशारा
sidhu moose wala
| Updated on: Aug 06, 2025 | 5:27 PM

Sidhu Moose Wala Statue Firing : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आज आपल्यात नाही. 2022 साली त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाने तेव्हा चांगलीच खळबळ उडाली होती. मूसेवालाच्या हत्येवर केंद्र सरकार, पंजाब सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, आता हाच मूसेवलाच्या मूर्तीसोबत भयंकर कृत्य करण्यात आले आहे. हे कृत्य समजताच त्याच्या आईनेही संताप व्यक्त केला आहे. आता या प्रकरणामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणातील डबवालीमधील सावंतखेडा या गावात सिद्धू मूसेवालाचा एक पुतळा आहे. या पुतळ्यावर काही लोकांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पुतळ्याची उभारणी जननायक जनता पार्टी म्हणजेच जेजेपी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिग्विजय चौटाला यांनी केली होती. हा प्रकार समोर आल्यामुळे सावंतखेडा गाव तसेच इतर भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. तर सिद्धू मूसेवालाची चरण कौर हिने माझ्या मुलाच्या मृत्यूचा हा अवमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.

तरीदेखील त्याच्या शत्रूंना…

हा गोळीबार म्हणजे सिद्धू मूसेवालाच्या आत्म्यावर हल्ला आहे. तसेच हा गोळीबार म्हणजे माझ्या मुलाच्या मृत्यूचा अवमान आहे, असंही त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत दु:ख व्यक्त केलंय. माझा मुलगा या जगात नाही. तरीदेखील त्याच्या शत्रूंना शांती मिळत नाहीये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केलीय.

गोळीबाराच्या मागे लॉरेन्स बिश्नोई गँग

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धू मुसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार झाल्यावर लगेच एका परदेशी मोबाईल क्रमांकावरून चौटाला यांना एक व्हिडीओ पाठवण्यात आला. या व्हिडीओत पुतळ्यावर गोळीबार केल्याचा व्हिडीओ पाठवण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्वोई गँगने घेतली आहे. तसेच मूसेवाला याच्या विचारांचे जो कोणी समर्थन देईल त्याला यापुढे लक्ष्य केले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. डबवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आपली चौकशी चालू केली आहे.

दरम्यान, सिद्धू मूसेवाला या प्रसिद्ध गायकावर 29 मे 2022 रोजी गोळीबार झाला होता. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात तो कारमध्ये बसून जात होता. याचवेळी त्याला मध्येच अडवून त्याच्यावर धाड-धाड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या दुर्घटनेत त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता.