मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर, भगव्या रंगाचा वापर, काय असणार सुविधा ?
बहुप्रतिक्षित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक जगासमोर आली आहे. या ट्रेनमध्ये आलिशान सुविधा असणार आहे. या ट्रेनचा पहिला टप्पा आधी गुजरात राज्यात सुरु होणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा पहिला फोटो समोर आला आहे. बुलेट ट्रनचे हे डिझाईन जपानच्या प्रसिद्ध शिंकानसेन (Shinkansen) टेक्नोलॉजीवर आधारित आहे. या ट्रेन सेटला ८ डब्बे असणार आहे. सुरुवातीच्या डिझाईन भगव्या रंगाच्या थीमचा वापर केलेला आहे. या ट्रेनला एअरोडायनामिक लूक देण्यात आला आहे.त्यामुळे हवेचा प्रतिरोध कमी होईल आणि जास्त वेगातही ट्रेन स्थिर राहिल. भारतात दोन प्रकारच्या बुलेट ट्रेन चालवल्या जाणार आहेत. ई-५ आणि ई-१० सिरीजच्या ट्रेनचा वापर केला जाईल. त्यानंतर भारतात तयार झालेल्या बी-२८ सिरीजच्या ट्रेन रुळांवर उतरतील.
भारतात मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किमीच्या मार्गावर प्रस्तावित बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे. ही बुलेट ट्रेन दर ताशी ३२० किमीच्या वेगाने धावणार आहे. या ट्रेनला हायस्पीड, कमी आवाज आणि खूप स्मूथ राईडसाठी डिझाईन केले आहे. एकूण आठ डब्याची ही ट्रेन २०० मीटर लांबीची असेल आणि एकावेळी यातून ९०० ते १००० हजार प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. ट्रेनचा पुढील भाग टोकेरी एअरोडायनामिक आहे. जास्त वेग असताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी जपानच्या शिंकानसेन बुलेट सारखे या बुलेटचे तोंड निमुळते असणार आहे.यामुळे जास्त वेगातही ट्रेन स्थिर आणि कमी आवाज करत धावेल. या ट्रेनमध्ये प्रवाशांना ध्वनीमुक्त आणि कंपन मुक्त प्रवासाचा आनंद घेता येईल.
आत असतील प्रीमियम सुविधा
बुलेट ट्रेनच्या आत प्रवाशांना विमानासारख्या आलिशान सुविधा असतील. आसने रुंद आणि रिक्लायनिंग असतील, त्यामुळे जास्त वेळ प्रवासी आरामात बसू शकतील. प्रत्येक सीटला युएसबी चार्जिंग आणि पॉवर सॉकेटची सुविधा असेल. ट्रेनमध्ये हायस्पीड वायफाय, मोठ्या खिडक्या, एलईडी एम्बिएंट लायटिंग आणि स्मार्ट जपानी स्टाईल टॉयलेंट्स असतील. तसेच दिव्यांगासाठी देखील विशेष सुविधा असतील.प्रत्येक कोचमध्ये मोठा लगेज एरिया आणि स्नॅक आणि चहा-कॉफीसाठी फूड सर्व्हीसची सुविधा असेल.
विना थांबा प्रवास केवळ २ तास ७ मिनिटांचा
देशाची पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. एकूण ५०८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ट्रेनचा विना थांबा प्रवास केवळ २ तास ७ मिनिटांचा असण्याचा अंदाज आहे. या कॉरिडॉरवर एकूण १२ स्थानके आहेत. मुंबई ( बीकेसी ), ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आहे.