
राज्याच्या विविध भागात सध्या पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. बिहारमधील लखीसराय येथेही पावसाने हजेरी लावली आहे. मात्र या भागात आकाशातून माशांचा पाऊस पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अनेकांनी हा चमत्कार असल्याचे म्हटले आहे. आकाशातून पडलेले हे मासे गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचेही समोर आले आहे. हा माशांचा पाऊस का पडतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार लखीसराय जिल्ह्यातील सदर तालुक्यातील दामोदरपूर गावात शुक्रवारी रात्री मुसळधार सुरु होता. या पावसादरम्यान अचानक आकाशातून मासे पडू लागले. गावकऱ्यांना सुरुवातीला वाटले की पावसासोबत काही किडे पडत आहेत. मात्र लोकांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना पावसासोबत जीवंत मासे पडत असल्याचे दिसले. यानंतर गावकऱ्यांनी हे मासे गोळा करण्यासाठी चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले.
गावातील जवळपास सर्वच लोक हे मासे गोळा करण्यात व्यस्त होते. काही लोकांनी एक किलोपेक्षा जास्त मासे गोळा केल्याचे समोर आले आहे. गावातील बरेच लोक याला चमत्कार मानत आहेत. मात्र हा चमत्कार नाही, तर एक नैसर्गिक घटना आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
आकाशातून माशांचा पाऊस पडण्यामागे एक अतिशय मनोरंजक आणि दुर्मिळ नैसर्गिक कारण आहे. अनेकदा एखादे लहान चक्रीवादळ समुद्र, तलाव किंवा नदीच्या पृष्ठभागावर तयार होतो. यामुळे पाणीही गोलगोल फिरते आणी आकाशात जाते. बऱ्याचदा पाण्यासोबत त्यात असलेले लहान मासे, बेडूक किंवा खेकडे आकाशात खेचले जातात. हे प्राणी शेकडो फूट उंचावर जातात.
काही काळानंतर चक्रीवादळाचा जोर कमी होतो त्यानंतर पावसासोबत हे प्राणी खाली पडू लागतात. जेव्हा ते जमिनीवर पडतात तेव्हा लोकांना वाटते की आकाशातून माशांचा पाऊस पडत आहे. 2022 मध्ये अमेरिकेतील टेक्सासमध्ये आणि 2024 साली थायलंडमध्ये अशीच एक घटना घडली होती.