उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का; माजी केंद्रीय मंत्री भाजपच्या गळाला

2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, आजही उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर, लखीमपूर आणि सीतापूर परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. | Jiten Prasada joins BJP

उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का; माजी केंद्रीय मंत्री भाजपच्या गळाला
जितिन प्रसाद

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितिन प्रसाद (Jiten Prasada) यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. रेल्वेमंत्री पियूष गोयल, भाजप खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. जितिन प्रसाद यांनी नुकतीच अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कमळ हातात धरले. (Congress leader jitin prasad joins BJP in UP)

जितीन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील सामर्थ्यशाली काँग्रेस नेत्यांपैकी एक होते. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 2019 मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदलाची मागणी करणाऱ्या जी-23 गटाच्या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.

जितिन प्रसाद हे काँग्रेसचे दिवंगत नेते जितेंद्र प्रसाद यांचे पूत्र आहेत. जितेंद्र प्रसाद हे राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या दोन माजी पंतप्रधानांचे सल्लागार होते. 2000 साली जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

कोण आहेत जितिन प्रसाद?

जितिन प्रसाद हे 2009 मध्ये उत्तर प्रदेशच्या धौराहा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. यूपीए-2 सरकारच्या काळात जितिन प्रसाद यांनी पेट्रोलियम आणि रस्ते वाहतूक ही खाती सांभाळली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
मात्र, आजही उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर, लखीमपूर आणि सीतापूर परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एक संयमी आणि विकासाभिमुख नेता म्हणून जितिन प्रसाद यांची ओळख आहे.

भाजप हाच खरा राष्ट्रीय पक्ष

मला याची जाणीव झाली की मी आता लोकांची मदत करू शकत नाही किंवा त्यांचे हितसंबंध जपू शकत नाही. माझ्या आयुष्याला नवी सुरुवात होत आहे. मला इतक्या वर्षांपासून साथ दिल्याबद्दल मी काँग्रेसमधील लोकांचे आभार मानतो. पण आता मी पूर्णपणे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजपा आहे, असे उद्गार जितीन प्रसाद यांनी पक्षप्रवेशावेळी काढले.

(Congress leader jitin prasad joins BJP in UP)