काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील चार कार्यकर्त्यांना लागले करंट; मोठी दुर्घटना टळली

राहुल गांधी यांनी आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या चार राज्यात यात्रा पूर्ण केली आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील चार कार्यकर्त्यांना लागले करंट; मोठी दुर्घटना टळली
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील चार कार्यकर्त्यांना लागले करंट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2022 | 12:01 PM

बेल्लारी: काँग्रेस (congress) नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत (bharat jodo yatra) दुर्देवी घटना घडली आहे. ही यात्री बेल्लारी येथे आली असता चार युवकांना शॉक लागला. करंट लागल्याने या चारही कार्यकर्त्यांना प्राथमिक उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चारही जणांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल गांधी यांची यात्रा आज सकाळी बेल्लारीहून सुरू झाली. ही यात्रा मौका नावाच्या ठिकाणी पोहोचली. काही कार्यकर्ते झेंडा फडकवत होते. या झेंड्याला लोखंडाचा दांडा होता. अचानक यातील चार जणांना करंट लागलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. भारत जोडो यात्रेत असलेल्या डॉक्टरांनी या चारही जणांना रुग्णवाहिकेत घेऊन त्यांच्यावर उपचार केला. यातील तिघांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.

काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी 3750 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं आहे. भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपणार आहे. एकूण 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे.

या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी जनतेशी संबंधित मुद्द्यांवर फोकस केला आहे. राहुल यांनी या दौऱ्यात महागाई, बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, चांगलं शिक्षण या मुद्द्यांवर अधिक लक्ष दिलं आहे. तसेच कर्नाटकातील तरुण कन्नडमध्ये परीक्षा का देऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या चार राज्यात यात्रा पूर्ण केली आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.