Gautam Gambhir | शिवभोजनला गौतम गंभीरची टक्कर, अवघ्या एका रुपयात भरपेट भोजन

| Updated on: Dec 25, 2020 | 11:30 AM

'एक आशा जन रसोई'च्या माध्यमातून गौतम गंभीर फाऊण्डेशन एका रुपयात भोजन उपलब्ध करणार आहे

Gautam Gambhir | शिवभोजनला गौतम गंभीरची टक्कर, अवघ्या एका रुपयात भरपेट भोजन
Follow us on

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दिल्लीवासियांसाठी नाममात्र किमतीत भोजनव्यवस्था सुरु केली आहे. ‘एक आशा जन रसोई’च्या (Ek Aasha Jan Rasoi) माध्यमातून गंभीर अवघ्या एका रुपयात पोटभर जेवणाची सोय करणार आहे. दिल्लीतील गांधीनगर भागात गंभीरने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोणीही उपाशी पोटी झोपू नये, या भावनेतून आपण ही व्यवस्था केल्याचं गौतम गंभीरने सांगितलं. (Gautam Gambhir launches Ek Aasha Jan Rasoi in Delhi)

संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे सरकारने शिवभोजनच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयात गरजूंसाठी पोटभर जेवणाची सोय केली आहे. दिल्लीतून भाजपच्या तिकीटावर खासदारपदी निवडून आलेल्या गौतम गंभीरनेही अशाच प्रकारे गरीबांसाठी भोजन व्यवस्था केली आहे. “आश्वासन नाही, तर शुद्ध हेतू आणला आहे, ना मंदिरातून आरती, ना मशिदीतून अजान आणली आहे, ना रामवचन ना मोहंमदांची दुआ आणली आहे, माणूस आहे, माणसासाठी दोन वेळचं जेवण आणलं आहे” असं ट्विट करत गंभीरने याविषयी माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियावर गंभीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिल्लीत आणखी ‘एक आशा जन रसोई’ उघडणार

गंभीरने गांधीनगर भागात ‘एक आशा जन रसोई’चे उद्घाटन केले. या सामुदायिक किचनच्या माध्यमातून गौतम गंभीर फाऊण्डेशन एका रुपयात भोजन उपलब्ध करणार आहे. कोणीही उपाशीपोटी झोपू नये, या उदात्त हेतूने आम्ही हा समाजोपयोगी उपक्रम सुरु केल्याचं गंभीरने सांगितलं. दिल्लीत अशाप्रकारची 5-6 सामुदायिक किचन सुरु केली जाणार असल्याची माहिती आहे.

जात-धर्म किंवा आर्थिक पार्श्वभूमी कुठलीही असो, प्रत्येकाला स्वच्छ, सकस आहार मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे माझं आधीपासूनच म्हणणं होतं. त्यामुळेच बेघर आणि असहाय्य व्यक्तींना दोन वेळचं जेवणही न मिळाल्यास माझं मन तीळतीळ तुटतं, अशा भावनाही गंभीरने व्यक्त केल्या.

एकाच वेळी 100 जणांची आसनव्यवस्था

देशातील सर्वात मोठे होलसेल कपडा मार्केट गांधीनगरमध्ये सुरु होणारी ‘एक आशा जन रसोई’ अत्याधुनिक असेल. गरजूंना तिथे एका रुपयात जेवण मिळेल. एकावेळी इथे 100 जणांची आसनव्यवस्था केली जाणार आहे. परंतु तूर्तास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी 50 जणांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

दुर्लक्षित राहिलेला भारताचा हिरो – गौतम गंभीर

(Gautam Gambhir launches Ek Aasha Jan Rasoi in Delhi)