अमिताभ बच्चन, अक्षयकुमारचे शुटींग रोखून दाखवाच; गिरीश महाजनांचे काँग्रेसला आव्हान

इंधन दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी ट्विट करावं नाही तर त्यांचे शुटिंग रोखण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. (girish mahajan slams congress over amitabh-akshy kumar remarks)

  • संदेश शिर्के, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली
  • Published On - 12:18 PM, 22 Feb 2021
अमिताभ बच्चन, अक्षयकुमारचे शुटींग रोखून दाखवाच; गिरीश महाजनांचे काँग्रेसला आव्हान
गिरीश महाजन

नवी दिल्ली: इंधन दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी ट्विट करावं नाही तर त्यांचे शुटिंग रोखण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवाच. महाराष्ट्रात काय मोगलाई काय?; असं आव्हानच गिरीश महाजन यांनी दिलं आहे. (girish mahajan slams congress over amitabh-akshy kumar remarks)

गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे आव्हान दिलं आहे. नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवावचं, असं आव्हानच त्यांनी महाजन यांनी दिलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या मुद्दयावरून कोणीही राजकारण करू नये. राम मंदिर हा आमच्या अस्थेचा प्रश्न आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

अधिवेशन होऊ नये म्हणून कांगावा

राज्यातील कोरोनाच्या स्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे. महाविकास आघाडीतील नेते जाहीर कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत आहेत. राज्य सरकारला अधिवेशन होऊ द्यायचे नाही. त्यामुळे हा कांगावा केला जात आहे, असा आरोप करतानाच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

भातखळकरांची टीका

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचा अर्थशास्त्राशी काडीचाही संबंध नाही. असेल तर त्यांचा टक्केवारीशी संबंध आहे. त्यामुळेच त्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राम मंदिराचा चंदा आठवला. काँग्रेसचा वाण नाही पण गुण त्यांना लागला आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. राऊत हे खोटं बोलून लोकांना भडकावण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. पेट्रोल-डिझेलच्या दरात 26 रुपये व्हॅट राज्य सरकारचा आहे. तो आधी कमी करा, इंधनाचे दर आपोआप कमी होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेवढं करावं, मगच पंतप्रधानांवर टीका करावी, असंही ते म्हणाले.

शिवसेनेची टीका

दरम्यान, शिवसेनेने दैनिक ‘सामना’तून इंधन दरवाढीवरून भाजपवर टीका केली होती. 2014 च्या आधी अक्षय कुमारपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक नायक-महानायकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका त्यांच्या मतांतून व्यक्त केला होता. लोकांनी आता कसे जगायचे, काय करायचे? असे प्रश्न त्यांनी समाजमाध्यमांवर एका तळमळीने विचारले होते, पण आता पेट्रोलने ‘शंभरी’ पार करूनही हे सर्व सेलिब्रिटी गप्प आहेत. यावर विरोधकांची टीकाटिपणी सुरू आहे. ते गप्प आहेत याचे कारण त्यांना गप्प बसवले आहे, असा दावा ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

याचा दुसरा सबळ अर्थ असा की, 2014 च्या आधी देशात मत व्यक्त करण्याचे, टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. सरकारी धोरणांवर टीका केली म्हणून एखाद्यास देशद्रोहाच्या कलमाखाली तुरुंगात ढकलले जात नव्हते. आज पेट्रोल-डिझेल दरवाढीवर संताप व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही आपण गमावले आहे. त्यामुळे अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांना उगाच दोष का देता? भयंकर कृषी कायद्याच्या बुलडोझरखाली भरडलेला शेतकरी आंदोलन करीत आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्याचे स्वातंत्र्य जिथे उरले नाही, तेथे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध देशातले सेलिब्रिटी आवाज उठवतील ही अपेक्षा का करता?, असा सवालही शिवसेनेकडून करण्यात आला आहे. (girish mahajan slams congress over amitabh-akshy kumar remarks)

 

संबंधित बातम्या:

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, सामनातून मोदींवर हल्लाबोल

हॉटेलमध्ये 21 कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं महापालिकेला जाग; अँटिजेन टेस्ट आणि RTPCR तपासणीला वेग

…म्हणून पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचलं; पेट्रोलियम मंत्र्यांनीच सांगितलं ‘कारण’

(girish mahajan slams congress over amitabh-akshy kumar remarks)