
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. मात्र तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. उलट आता ती वाढवली असून, नोव्हेंबर महिन्यात गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत भारतानं रशियाकडून सर्वाधिक बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे आता मॅक्सिकोने देखील मोठा निर्णय घेतला आहे. मॅक्सिकोने भारतासह आशियामधील जवळपास सर्वच देशांवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. एकीकडे अमेरिकेच्या टॅरिफचं संकट भारतावर असताना आता आणखी एक मोठं संकट घोंगावत आहे. मात्र या टॅरिफच्या दबावामध्ये देखील भारतासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी गुड न्यूज आली आहे.
भारताची निर्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल 19.37 टक्क्यांनी वाढली आहे. भारताची निर्यात आता 38.13 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आयात मात्र कमी झाली असून, आयातीमध्ये 1.88 टक्के घसरण झाली आहे, घसरणीसह भारताची आयात 62.66 अब्ज डॉलर एवढी आहे. सोमवारी या संदर्भातील अधिकृत आकडेवारी सरकारच्या वतीनं जारी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटलं की, नोव्हेंबर महिन्यात भारताच्या निर्यातीने मोठी झेप घेतली असून, ऑक्टोबर महिन्यात जे नुकसान झालं होतं, त्याची भरपाई नोव्हेंबर महिन्यातील निर्यातीमुळे झाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सर्वाधिक निर्यात असल्याचा दावा देखील अग्रवाल यांनी केला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात तोट्याचं प्रमाण 24.53 अब्ज डॉलर एवढं राहिलं आहे.
मॅक्सिको लावणार टॅरिफ
दरम्यान दुसरीकडे आता मॅक्सिकोने देखील भारतासह आशिया खंडातील सर्वच देशांवर टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली आहे, येत्या 1 जानेवारीपासून मॅक्सिको भारतावर टॅरिफ लावणार आहे. याचा मोठा फटका हा निर्यातीला बसण्याची शक्यता असल्यामुळे निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आवश्यक ती पाऊलं उचलली जातील असे संकेत भारत सरकारने दिले आहेत.