सरकारची गुगल प्ले स्टोअरला नोटीस, ते 7 अ‍ॅप हटवण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

काही चिनी अ‍ॅपचा वापर करून रस्त्यावरच ई-रिक्षा थांबवल्या जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

सरकारची गुगल  प्ले स्टोअरला नोटीस, ते 7 अ‍ॅप हटवण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
सरकारची गुगल प्ले स्टोअरला नोटीस
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 03, 2026 | 8:29 PM

इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. मध्यपूर्वेतून होणारा कच्च्या तेलाचा साठा जवळपास ठप्पच झाला होता. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती देखील चांगल्याच वाढल्या होत्या. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात देखील वाढ करण्यात आल्याचं पहायला मिळालं. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच चालले आहेत, त्याची मोठी आर्थिक झळ ही वाहनधारकांना बसत असल्यामुळे आता अनेकांनी आपला मोर्चा हा इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळवला आहे. 2025 च्या तुलनेत 2026 मध्ये देशात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढली आहे. सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. इलेक्ट्रिक वाहनाचे अनेक फायदे आहेत, एक तर या वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होतं, दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची झळ देखील बसत नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक व्हेकलसोबत एक विचित्र प्रकार घडताना दिसत आहे, त्यामुळे ईव्ही मालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

काही चिनी अ‍ॅपचा वापर करून रस्त्यावरच ई-रिक्षा थांबवल्या जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशा पद्धतीने एखादं इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावरच अचानक बंद पडल्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडीची देखील समस्या निर्माण होत आहे.काही मोबाईल अ‍ॅप्स आणि ब्लूटूथद्वारे ईव्ही वाहनाची बॅटरी सिस्टम बंद करून ही वाहनं थांबली जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

BAT-BMS सारख्या अ‍ॅप्समधून इलेक्ट्रिक वाहन बंद केले जात असल्याचा आरोप होत आहे. हे अ‍ॅप शेन्झेन ग्रेनर्जी टेक्नॉलॉजी या चीनी कंपनीने विकसित केलेले बॅटरी व्यवस्थापन प्रणाली ॲप आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर देखरेख ठेवण्याचा हेतू या अ‍ॅपचा आहे. दरम्यान या पार्श्ववभूमीवर आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ई-रिक्षा किंवा वाहनांमधील बॅटरी बंद करण्यासाठी ॲप्सचा गैरवापर केल्याप्रकरणी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयओएसला त्यांच्या अ‍ॅप स्टोअरवरून 7 ॲप्लिकेशन्स काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.
यात BAT-BMS, SMART BMS आणि LOSSIGY यांसारख्या काही अ‍ॅप्सचा समावेश आहे.

 

Follow Us