
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर टॅरिफ लावून मोठा धक्का दिला, त्यानंतर आता त्यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली आहे, आता एच-1 बी व्हिसासाठी तब्बल एक लाख डॉलर म्हणजे भारतीय चलनामध्ये 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. याचा मोठा परिणाम हा भारतावर तर होणारच आहे, मात्र यामुळे अमेरिका देखील मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामधील दोन मोठ्या बाजारपेठा कायमच्या बंद होऊ शकतात, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसाचं शुल्क वाढवल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला आहे, तो म्हणजे अनेक एअरलाइन्स कंपन्यांनी अमेरिका आणि भारता दरम्यान सुरू असलेल्या आपल्या अनेक विमानाच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी घट होणार आहे, असा या कंपन्यांचा अंदाज असून, त्यांनी खबरदारी म्हणून आतापासूनच अनेक फेऱ्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. हा एअरलाइन्स क्षेत्रासाठी मोठा झटका मानला जात आहे, कारण अमेरिका आणि भारत याच्यांमधील अंतर इतर देशांच्या तुलनेनं जास्त आहे, त्यामुळे एअरलाइन्स कंपन्यांसाठी हे एक मोठं मार्केट होतं. सगळ्यात जास्त एअर इंडियाकडून आपल्या फेऱ्या कमी केल्या जाण्याची शक्यत आहे. 444 वरून 278 वर ही संख्या येऊ शकते असा अंदाज आहे.
दरम्यान दुसरीकडे दरवर्षी भारतामधून अमेरिकेत मोठ्या संख्येनं पर्यटक जात असतात, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफनंतर या क्षेत्रात अमेरिकेला मोठा दणका बसला आहे, पर्यटकांच्या संख्येत मोठी घसरण पहायला मिळत आहे, गेल्या तीन महिन्यांमध्ये अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सरासरी 15 टक्क्यांनी घट झाली आहे, याचा तेथील पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यातच आता एच 1 बी व्हिसावरील शुल्क वाढवण्यात आल्यामुळे या क्षेत्रावर त्याचा आणखी परिणाम होणार आहे.