Punjab : पाकिस्तानातून ड्रोनने अमृतसरमध्ये पाठवली स्फोटकं; स्वातंत्र्यदिनाआधी यंत्रणा अलर्टवर!

| Updated on: Aug 09, 2021 | 3:09 PM

अमृतसरच्या ग्रामीण भागात हे बॉम्ब आढळून आले आहेत. यामध्ये हँड ग्रेनेड, टिफीन बॉम्ब आणि काही काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या डब्यात IED ठेवून हा टिफीन बॉम्ब तयार करण्यात आला होता.

Punjab : पाकिस्तानातून ड्रोनने अमृतसरमध्ये पाठवली स्फोटकं; स्वातंत्र्यदिनाआधी यंत्रणा अलर्टवर!
Follow us on

चंडीगढ : स्वातंत्र्यदिन (Independence Day) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पंजाबमधून (Punjab) एक खळबळजनक घटना समोर येत आहे. अमृतसरच्या (Amritsar) ग्रामीण भागात हँड ग्रेनेड (Hand Grenade) आणि टिफीन बॉम्ब (Tiffin Bomb )आढळून आले आहेत. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) या कटाचा पर्दाफाश केला आहे. हे बॉम्ब पाकिस्तानातून ड्रोनच्या (Pakistan Drone) माध्यमातून भारतात पाठवले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घातपाताच्या शक्यता पाहाता स्वातंत्र्यदिनाच्या आधी सर्व यंत्रणा अलर्टवर गेल्या आहेत. (Hand grenades and tiffin bombs have been found in rural areas of Amritsar in Punjab, where drones sent by Khalistani organizations from Pakistan)

पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता (DGP Dinkar Gupta) यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतसरच्या ग्रामीण भागात हे बॉम्ब आढळून आले आहेत. यामध्ये हँड ग्रेनेड, टिफीन बॉम्ब आणि काही काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या डब्यात IED ठेवून हा टिफीन बॉम्ब तयार करण्यात आला होता. ही सर्व स्फोटकं पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहेत. यामध्ये 5 हँड ग्रेनेड, 1009 MM काडतुस आणि टिफीन बॉक्सचा समावेश आहे. ही स्फोटकं एका बॅगेतून भारतात पाठवण्यात आली. पाकिस्तानी सीमेजवळच्या एका गावातून ही स्फोटकं ताब्यात घेण्यात आली आहेत.

2 किलो RDX चा टाईम बॉम्ब

पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार IED टिफीन बॉम्बमध्ये 2 किलो RDX लावण्यात आलेलं होतं. त्याला बटण बसवून हा टाईम बॉम्ब बनवण्यात आला होता. विशेष म्हणजे चुंबकाचा वापर करून हा बॉम्ब असा बनवण्यात आला होता की, हाताळण्यात थोडी जरी चूक झाली तरी बॉम्बचा स्फोट होईल. याशिवाय मोबाईल फोनच्या माध्यमातूनही बॉम्बचा स्फोट घडवणं शक्य होतं. शनिवारी पंजाब पोलिसांनी ड्रोनची संशयास्पद हलचाल टिपली होती. त्यानंतर रविवारी या परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर ही स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची योजना

पाकिस्तानातून पाठवण्यात आलेली ही स्फोटकं पंजाबमधल्या गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणार होती अशी माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्रीही स्फोटकांच्या निशाण्यावर असू शकत होते असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला. 2 किलो RDX चा स्फोट झाला असता तर त्यामुळे मोठं नुकसान झालं असतं. पण पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली.

खलिस्तानी संघटनांवर संशय

ही स्फोटकं पंजाबमध्ये पाठवण्यात खलिस्तानी संघटनांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. खलिस्तानी संघटना (Khalistani Organisation) सिख फॉर जस्टिस (Sikh for Justice) किंवा इतर संघटना या कृत्यामागे असू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आता पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या : 

पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब सापडला, शहरात एकच खळबळ

Maharashtra News LIVE Update | पिंपरीच्या कोहिनूर इमारतीत खोदकाम सुरु असताना सापडला बॉम्ब