शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी, शिंदे गटाचे टेन्शन वाढले, कपिल सिब्बल यांचा काल जोरदार युक्तीवाद..
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी आहे. दिल्लीत घडामोडींना वेग आला. त्यातच आज कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद कोर्टात केला जाणार आहे. कपिल सिब्बल यांनी सुनावणीत मोठे दावे केले आहेत.

शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणीला सुरूवात होईल. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आज देखील युक्तिवाद करणार आहेत. काल कपिल सिब्बल यांनी 45 मिनिटे युक्तिवाद केला होता. शिवसेना शिंदे गटाकडूनही युक्तीवाद झाला. कालच्या सुनावणीत महत्वपूर्ण मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडली. कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की, विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा सुभाष देसाई प्रकरणातील घटनापीठाच्या निकालाच्या थेट विरोधात आहे.
विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्षाचा दर्जा देता येत नाही, दहाव्या अनुसूचीनुसार हे मान्य नाही. पक्षातील मतभेद असल्याच्या नावाखाली केलेला पक्षांतराचा बचाव हा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा आधारही नव्हता. मतभेदांच्या नावाखाली राजकीय निष्ठा बदलण्यास परवानगी दिल्यास काही आमदारांच्या पक्षांतरातूनही सरकारे अस्थिर केली जाऊ शकतात.
विधानसभा अध्यक्षांसमोरील आमदार अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक आयोगासमोरील निवडणूक चिन्ह आदेशानुसार होणारी कार्यवाही या दोन्ही स्वतंत्र आहेत, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले. कथित पक्षांतराची पहिली घटना 21 जून 2022 रोजी घडल्याने मूळ राजकीय पक्षाची ओळख त्याच तारखेच्या परिस्थितीनुसार निश्चित केली पाहिजे.
निवडणूक आयोगाने त्यानंतर एखाद्या गटाला दिलेली मान्यता भविष्यातील परिणामांसाठी लागू होऊ शकते. मात्र, त्यावरून यापूर्वीची कृती पक्षांतर ठरते की नाही, हे निश्चित करता येणार नाही. पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतोदाला हटवणे, एकनाथ शिंदे यांना पुन्हा गटनेता म्हणून मान्यता देणे आणि राज्यपालांना ठरावाची माहिती देणे, या कृती पक्षातील मतभेद व्यक्त करण्यासाठी नव्हे, तर सरकार अस्थिर करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्या होत्या. खरेच वैचारिक मतभेद असते, तर पक्षाच्या संघटनात्मक संस्थांच्या बैठका बोलावून अंतर्गत पातळीवर मतभेद सोडवण्याचा प्रयत्न झाला असता, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले.