श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही मशीद वादावर आज सुनावणी, काय आहे मथुरा वाद? जाणून घ्या

13.37 एकर जमिनीच्या मालकीवरून मथुरेमध्ये वाद सुरू आहे. यामध्ये 10.9 एकर जमीन श्री कृष्ण जन्मस्थानजवळ आणि 2.5 एकर जमीन शाही इदगाह मशिदीजवळ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, रंजना अग्निहोत्री यांनी हा दावा दाखल केला आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही मशीद वादावर आज सुनावणी, काय आहे मथुरा वाद? जाणून घ्या
मथुरा वाद
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 13, 2022 | 10:18 AM

मथुरा,श्रीकृष्ण जन्मभूमी (Shree Krishna Janmbhoomi) आणि शाही मशीद प्रकरणी आज मंगळवारी सुनावणी (Hearing) होणार आहे. मथुरा न्यायालयाने गेल्या सुनावणीत या वादाशी संबंधित पुनर्विचार याचिका पुढे ढकलली होती. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर 13 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. या संदर्भात फिर्यादींचे वकील राजेंद्र माहेश्वरी आणि महेंद्र प्रताप सिंग यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोमवारी इदगाह व्यवस्था समितीचे सचिव अधिवक्ता तनवीर अहमद, अधिवक्ता मुकेश खंडेलवाल आणि विजय बहादूर सिंह, श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि जन्मस्थान सेवा संस्थेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मात्र यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडून कोणीही हजर राहिले नाही. नोटीस न दिल्याने वक्फ बोर्डाकडून कोणीही आले नसल्याचे सांगितल्या जात आहे.

काय म्हणाले फिर्यादीचे वकील?

जिल्हा न्यायाधीशांनी आता या खटल्याची पुढील तारीख निश्चित केल्याचे फिर्यादीने सांगितले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 13 सप्टेंबरला म्हणजेच आज होणार आहे. जिल्हा सरकारी वकील संजय गौर यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या आधी  कृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह वादाच्या एका प्रकरणात सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीत याचिकाकर्ते शैलेंद्र सिंह यांनी या खटल्याला स्थगिती देण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. व्यवसायाने वकील असलेले सिंग यांनी प्रकृतीच्या कारणास्तव स्थगिती अर्ज दाखल केला होता. जो मथुरेच्या कोर्टाने फेटाळला होता. त्याचबरोबर न्यायालयाने या खटल्याची पुढील तारीख 26 सप्टेंबर निश्चित केली आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनीही या अर्जावर आक्षेप घेतला होता.

 

काय आहे मथुरा वाद?

13.37 एकर जमिनीच्या मालकीवरून मथुरेमध्ये वाद सुरू आहे. यामध्ये 10.9 एकर जमीन श्री कृष्ण जन्मस्थानजवळ आणि 2.5 एकर जमीन शाही इदगाह मशिदीजवळ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, रंजना अग्निहोत्री यांनी हा दावा दाखल केला आहे. काशी आणि मथुरेत औरंगजेबाने मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती असा हिंदूंचा दावा आहे. औरंगजेबाने 1669 मध्ये काशी येथील विश्वनाथ मंदिर पाडले आणि 1670 मध्ये मथुरेतील भगवे केशवदेव मंदिर पाडण्याचा हुकूम जारी केला. यानंतर काशीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेत शाही इदगाह मशीद बांधण्यात आली असे याचिका कर्त्यांचे म्हणजे आहे.