प्रेम की जगह अनिश्चित हैं… सांगणाऱ्या महाकवीने घेतला जगाचा निरोप, विनोद कुमार शुक्ल कालवश

हिंदी साहित्यविश्वातील सुप्रसिद्ध लेखक, कवी विनोद कुमार शुक्ल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रेम की जगह अनिश्चित हैं... सांगणाऱ्या महाकवीने घेतला जगाचा निरोप, विनोद कुमार शुक्ल कालवश
vinod kumar shukla
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 23, 2025 | 7:50 PM

Vinod Kumar Shukla Passes Away :  प्रेम की जगह अनिश्चित हैं… असे म्हणत प्रेमावर बोलणारे, मानवी जीवनातील आनंद शोधणारे तसेच ‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था…’ अशी कविता रचून मानवाने धर्म, जात, पंथ, भेद विसरून माणूस म्हणून एकमेकांच्या कामी यावं, असा संदेश देणारे हिंदी साहित्यविश्वातील सुप्रसिद्ध कवी, लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना रायपूरमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने भारतीय साहित्य जगताची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंदी साहित्यात दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना अलिकडेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विनोद कुमार शुक्ल कोण होते?

विनोद कुमार शुक्ल हे एक सुप्रसिद्ध कवी आणि लेख होते. त्यांची ‘दिवार मे एक खिडकी रहती थी’ ही आजही तेवढीच प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1937 रोजी छत्तीसगडमधील राजनांदगांव येथे झाला होता. ते छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये वास्तव्यास होते. गेल्या पाच दशकांपासून ते लिहित होते. त्यांचे उच्च शिक्षण जबलपूर कृषी विद्यालयातून पूर्ण केले. प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करत करत ते लिहायचे. त्यांच्या अनेक साहित्यकृती आजही वाचक आवडीने वाचतात.

1971 साली त्यांचा लगभग जयहिंद हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या लेखणीला चांगलीच धार होती. म्हणूनच फक्त भारतच नव्हे तर परदेशातही ते लेखक म्हणून प्रसिद्ध होते. नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, दीवार में एक खिड़की रहती थी या त्यांच्या काही प्रमुख आणि प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेले पुरस्कार

विनोद कुमार शुक्ल यांना आतापर्यंत अनेक मोठे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. पेन/नाबोकोव पुरस्कार, दयावती मोदी कवि शेखर सन्मान, गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, रजा पुरस्कार, हिंदी गौरव सम्मान यासारखे मोठे पुरस्कार मिळालेले आहेत.

विनोद कुमार शुक्ल यांचे कवितासंग्रह

लगभग जयहिंद

वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह

सब कुछ होना बचा रहेगा

अतिरिक्त नहीं

कविता से लंबी कविता

आकाश धरती को खटखटाता है

पचास कविताएं

कभी के बाद अभी

कवि ने कहा -चुनी हुई कविताएं