क्रूरतेचा कळस! आधी दगडाने ठेचलं, नंतर मृतदेहाचे कपडे फाडले अन्..; हिंदू व्यापऱ्याच्या हत्येने देश हादरला
बांगलादेशच्या ढाका येथे एका हिंदू भंगार व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका हिंदू भंगार व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाल चंद उर्फ सोहाग (39) असे हत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून 9 जुलै रोजी हा प्रकार घडला आहे. अत्यंत क्रूर प्रकारे ही हत्या झालेली असल्याने या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिटफोर्ड हॉस्पिटलजवळ हल्लेखोरांनी लाल चंद उर्फ सोहाग यांना विटा आणि काँक्रीटच्या स्लॅबने मारहाण करून ठार मारले. पण इतक्यावरच हे हल्लेखोर थांबले नाहीत. हत्येनंतर हल्लेखोरांनी लाल चंद यांचे कपडे फाडले आणि काही जण त्यांच्या मृतदेहावर उड्या मारत नाचताना दिसले. स्थानिक माध्यमांनुसार, ही हिंसा खंडणीच्या वादातून उद्भवली असावी असे सांगण्यात येत असले तरी खरे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
या घटनेनंतर देशभरात तीव्र निदर्शने सुरू झाली असून या क्रूरतेबाबत संताप व्यक्त केला हात आहे. तर दुसरीकडे वकील युनूस अली अकंद यांनी रविवारी (13 जुलै) उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या हत्येच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. लाल चंद यांच्या बहिणी, मंजुआरा बेगम (42), यांनी गुरुवारी कोतवाली पोलिस ठाण्यात हत्येची तक्रार नोंदवली आहे. ज्यामध्ये 19 नावाजलेल्या आणि 15-20 अज्ञात आरोपींचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत महमुदुल हसन मोहिन, तारेक रहमान रॉबिन, आलमगीर, मोनीर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज, (14 जुलै) होणार आहे.
अनेक विद्यापीठांमध्ये दोषींच्या शिक्षेसाठी निदर्शने..
दरम्यान, लाल चंद उर्फ सोहाग यांच्या हत्येनंतर शनिवारी रात्री ढाक्यातील अनेक विद्यापीठे आणि काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. निदर्शनकर्त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) वर त्यांच्या कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.
यावर बोलताना छत्र फेडरेशनचे अध्यक्ष सैकत आरिफ म्हणाले की, ‘हसीना यांच्या सत्तापतनानंतर, BNP नेते व्यवसाय नियंत्रणासाठी आपापसात भांडत आहेत, ज्यामुळे अशा हत्या घडत आहेत. BNP ला वाटते की हकालपट्टी पुरेशी आहे, परंतु आम्ही दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो, असे सैकत यांनी सांगितलं.
