
प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारीला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. पहिली यादी भारत सरकारकडून जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की, पद्म पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात येणारी पदकं नेमकी कुठे तयार केली जातात, आणि त्यासाठी भारत सरकारला किती खर्च येतो? सर्व पद्म पुरस्काराचे पदकं हे कोलकातामध्ये स्थित अलीपुरच्या टांकसाळीमध्ये तयार केली जातात. या टांकसाळीवर भारतीय अर्थ मंत्रालयाचं नियंत्रण असतं, भारतरत्न पुरस्कारावेळी देण्यात येणारं पदकं देखील याच टांकसाळीमध्ये तयार करण्यात येतं.
ही सर्व पदकं अतिशय अचूकतेने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली जातात. या सर्व पदकांवर कमळाचं चिन्ह आणि आणि देवनागरी तसेच इंग्रजी भाषेमध्ये शिलालेख असतो. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण हे भारतामधील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचे पुरस्कार मानले जातात. मात्र त्यासाठी देण्यात येणारं पदक तयार कताना पूर्णपणे सोनं, किंवा चांदीचा वापर होत नाही. पद्मविभूषण पदक प्रमुख्यानं कांस्यापासून बनवलेलं असतं, आणि त्याच्या दोन्ही बाजुनं ते प्लॅटिनमने सजवलेलं असतं. तर पद्म भूषण पुरस्कारासाठी देण्यात येणारं पदक हे कास्यापासून तयार केलेले असतं. परंतु त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला असतो. तर पद्मश्री पुरस्कारासाठी देण्यात येणारं पदक देखील असंच तयार करण्यात येतं, मात्र त्याच्या वरील बाजूस स्टेनलेस स्टीलची सजावट असते.
पदक तयार करण्यासाठी किती खर्च येतो?
हे पदक तयार करण्यासाठी किती खर्च येतो, हे सार्वजनिक स्वरुपात समोर येत नाही, कारण ही सर्व पदकं सरकारी नियंत्रण असलेल्या टांकसाळीमध्ये तयार केली जातात. तसेच हे पुरस्कार ज्यांना मिळतात, त्यांना कोणतीही खास आणि विशेष अशी सरकारी सूट किंवा पेन्शनची देखील सुविधा नसते. विविध क्षेत्रात उत्कृष कामगिरी करणाऱ्या लोकांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.