
हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्याबाबत एकापाठोपाठ एक असे मोठे खुलासे होत आहेत. ती पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला गेली होती. तिना भारतीय लष्कराची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु आहे की पाकिस्तानची ISI ही संस्था त्यांच्या एका एजंटला किती पैसे देते? कारण, ज्योती मल्होत्रा ज्या प्रकारे लग्झरी आयुष्य जगत होती ते उघड झाल्यानंतर हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…
ज्योती मल्होत्रा २०२०पर्यंत एका प्रायवेट कंपनीमध्ये वीस हजार रुपयांची नोकरी करत होती. लॉकडाउननंतर तिने यूट्यूब चॅनेल चालवण्यास सुरुवात केली. त्याच काळात ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: अशी काढायची भारतीय लष्कराची रहस्ये, नंतर पाक गुप्तचर यंत्रणेपर्यंत पोहोचवायची; कशी पकडली गेली ज्योती मल्होत्रा
हेरगिरीसाठी किती पैसे देते ISI?
समोर आलेल्या माहितीनुसार, ISI सर्वप्रथम ठिकाणाला प्राधान्य देते. म्हणजेच, गुप्त माहिती कुठून मिळवायची आहे, यावरून पैसे ठरवले जातात. उदाहरणार्थ, थायलंड आणि म्यानमारसारख्या देशांसाठी कमी पैसे दिले जातात. तर भारत, अमेरिका यांसारख्या देशांतून गुप्त माहिती मिळवण्यासाठी ISI जास्त पैसे खर्च करते. म्हणजेच या देशांमध्ये काम करणाऱ्या एजंटांना ISI जास्त पैसे देते. गुप्तहेरांना पैसे देण्यासाठी ISI ला पाकिस्तान सरकारकडून दरवर्षी ५ अब्ज रुपयांचा निधी मंजूर केला जातो. ISI या पैशांचा उपयोग आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आणि गुप्तहेरांना पैसे देण्यासाठी करते. अहवालानुसार, ISI अंतर्गत सध्या ४ हजार कर्मचारी आहेत.
पाकिस्तानकडून एका गुप्तहेराला किती पैसे मिळतात?
याबाबत पाकिस्तान सरकारने किंवा गुप्तचर संस्था ISI ने कधीच कोणती माहिती दिलेली नाही. परंतु पकडलेल्या गुप्तहेरांनी केलेल्या खुलाशांनुसार, माहितीच्या आधारावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था गुप्तहेरांना पैसे देते. पंजाब पोलिसांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये अमृतसर येथून एका ISI एजंटाला अटक केली होती. अटकेनंतर अमृतसर ग्रामीणच्या SSP यांनी पत्रकार परिषद घेतली होती. SSP यांचे म्हणणे होते की ISI लहान माहितीसाठी ५ हजार रुपये आणि मोठ्या माहितीसाठी १० हजार रुपये देते.
२०११ मध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याला पाकिस्तानसाठी गुप्तचर म्हणून काम करताना पकडले गेले होते. त्या अधिकाऱ्याने खुलासा केला होता की पाकिस्तानने गुप्तचर कार्यासाठी त्याला ३ कोटी रुपये दिले होते. याचा अर्थ असा की पाकिस्तानची गुप्तचर संस्था पद आणि माहितीच्या आधारावर आपल्या गुप्तहेरांना पैसे देते. ज्योती मल्होत्रा प्रकरणात आतापर्यंत ही माहिती समोर आलेली नाही की तिला किती रुपये देण्यात आले होते.