
लग्न हे सात जन्मांचं बंधन असतं असं म्हणतात. आयुष्यभर साथ देण्याचं, सुख-दु:खात नेहमी साथ देण्याचं वचन पती-पत्नी एकमेकांना देतात. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बीना क्षेत्रात हे वचन खरं ठरलं. तिथे नारायण रैकवार आणि त्यांची पत्नी शिवकुमारी रैकवार यांच एकमेकांवर इतकं गाढ प्रेम होतं की पत्नीच्या मृत्यूचा धक्का बसल्यामुळे अवघ्या एका तासांत पतीनेही हे जग सोडलं.
पत्नीच्या निधनामुळे पतीला धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, बिना येथील भीम वॉर्डमधील रहिवासी शिवकुमारी रैकवार या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर विदिशा मेडिकल कॉलेज आणि भोपाळ हमीदिया रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा डॉक्टरांनी हार मानली. त्यांना घरी नेण्यात येत होते, तेव्हा रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अखेर मुलं त्यांच्या आईचा मृतदेह घेऊन घरी पोहोचली. पण त्याचे वडील, शिवकुमारी यांचे पती नारायण रायकवार यांना ही दुःखद बातमी समजली तेव्हा ते अस्वस्थ झाले. मोठा धक्का बसून एका कोपऱ्यात बसले आणि काही वेळाने ते तिथेच पडले. मुलांनी त्यांना पकडण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा श्वासही थांबला होता.
एकाच दिवसांत सुटली 48 वर्षांची साथ
नारायण आणि शिवकुमारी रैकवार हे गेल्या 48 वर्षांपासून एकमेकांसोबत होते. पत्नीचा निर्जीव मृतदेह पाहताच पती नारायण यांनीही आपला जीव सोडला. काही क्षणातच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची तीन मुलं आणि एक मुलगी एका क्षणात अनाथ झाले.
एकत्र दिला अग्नि
पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन झाल्याने गावातले सगळेच हलहळले. त्यांच्या मुलांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. अखेर गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी मिळून दोघांच्याही मृतदेहांची अंत्ययात्रा काढली. स्मशानभूमीत, पती-पत्नीची चिता फक्त एक मीटर अंतरावर ठेवण्यात आली आणि त्यांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले.
गावात सध्या सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू असून हे खऱ्या प्रेमाचे उदाहरण आहे असं लोक म्हणत आहे. पती-पत्नीमधील नातं, त्यांचं प्रेम इतक गाढ होतं की त्यांना एकमेकांशिवाय राहणे अशक्य होते असंही काही जण म्हणत होते.