धो-धो बसरणार… महाराष्ट्रासह या राज्यांवर मोठं संकट, हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अलर्ट

IMD Rain Alert : सगळीकडे उष्णतेची लाट सुरू असताना दक्षिण आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील 7 दिवसांसाठी हवामान खात्याने काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

धो-धो बसरणार... महाराष्ट्रासह या राज्यांवर मोठं संकट, हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अलर्ट
Heavy Rain Alert by IMD
Image Credit source: Google
| Updated on: May 17, 2026 | 7:50 PM

संपूर्ण भारतात सध्या सूर्य आग ओकत आहे, अनेक शहरांचे तापमान 45 अंशांच्या वर गेलेले आहे. सगळीकडे उष्णतेची लाट सुरू असताना दक्षिण आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता हवामान विभागाने नागालँड, मणिपूरसह सहा राज्यांमध्ये पुढील सात दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर ईशान्य भारत, अंदमान-निकोबार बेटे, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्येही पुढील सात दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या 6 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने ईशान्य भारतात 18 मे रोजी आसाम आणि मेघालयमध्ये, तर 17 मे रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 18 ते 19 मे दरम्यान नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 17 ते 23 मे या कालावधीत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तमिळनाडू आणि केरळमध्येही पावसाचा अलर्ट

हवामान विभागाने दक्षिण भारताबाबतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारी आंध्र प्रदेशात 20 आणि 21 मे मेघगर्जना, वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकातील आतील भागात 17 आणि 18 मे रोजी वादळी वाऱ्यांसह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये 17 ते 19 मे दरम्यान, केरळ आणि माहेमध्ये 17 ते 21 मे याकालात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, तर लक्षद्वीप आणि किनारी कर्नाटकात 17 आणि 18 मे रोजी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच रायलसीमा आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे.

उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही वातावरण बदलणार

उत्तर-पश्चिम भारतातही आगामी काळात हवामान बदलणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 19 आणि 20 मे रोजी, तर उत्तराखंडमध्ये 20 ते 23 मे दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 19 ते 23 मे दरम्यान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य भारतातही पावसाचा इशारा

हवामान विभागाने मध्य भारतातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात 17 मे रोजी, तर छत्तीसगडमध्ये 17 आणि 18 मे रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us