घराबाहेर पडू नका… महाराष्ट्रासह या राज्यांना पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Heavy Rainfall Warning : आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात पश्चिम किनारपट्टी, ईशान्य भारत तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

देशाच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली असली तरी उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची तीव्रता कायम आहे. मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या उर्वरित भागांमध्ये तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात पश्चिम किनारपट्टी, ईशान्य भारत तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर 27 ते 29 जूनदरम्यान उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये, तर 28 जून रोजी आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर-पश्चिम भारतात मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 25 जून तसेच 30 जून ते 1 जुलैदरम्यान जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. 30 जून ते 1 जुलैदरम्यान हिमाचल प्रदेशात, तर 29 जून ते 1 जुलैदरम्यान उत्तराखंडमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. पूर्व उत्तर प्रदेशातही 30 जून ते 1 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 26 ते 29 जून, हिमाचल प्रदेशात 28 ते 29 जून आणि उत्तराखंडमध्ये 25 ते 28 जूनदरम्यान काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील.
हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाबमध्ये 25 ते 27 जून तसेच 29 जून ते 1 जुलैदरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेशात 30 जून ते 1 जुलैदरम्यान, पूर्व उत्तर प्रदेशात 29 जून ते 1 जुलैदरम्यान आणि पश्चिम राजस्थानमध्ये 26 जून रोजी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मध्य भारतात वादळी पावसाचा इशारा
पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये 25 जून ते 1 जुलैदरम्यान, विदर्भात 26-27 जून आणि 30 जून ते 1 जुलैदरम्यान, तर छत्तीसगडमध्ये 25-26 जूनदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात 25 जून आणि 28-29 जून रोजी, तर छत्तीसगडमध्ये 27 जून ते 1 जुलैदरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 27 ते 29 जून, पूर्व मध्य प्रदेशात 26 ते 29 जून आणि विदर्भात 25 ते 28 जूनदरम्यान वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये 25 ते 29 जूनदरम्यान जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशात 25 जून रोजी, विदर्भात 25 जून तसेच 27-28 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
पूर्व भारतातही पावसाचा जोर वाढणार
अंदमान-निकोबार बेटे आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये 25 जून ते 1 जुलैदरम्यान, गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये 29 जून ते 1 जुलैदरम्यान, तर बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 28 जून ते 1 जुलैदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारमध्ये 25-26 जून आणि 28 जून रोजी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
दक्षिण भारतातही जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागाने 25 जून ते 1 जुलैदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्क आहे. उत्तर आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक तसेच तेलंगणामध्ये 25 जून रोजी, किनारी आंध्र प्रदेश आणि यानममध्ये 25 जून तसेच 29 जून ते 1 जुलैदरम्यान, तर रायलसीमामध्ये 25-26 जून आणि 28 जून ते 1 जुलैदरम्यान पावसाचा अंदाज आहे.