
शेजरी म्हटलं की कडू-गोड आठवणी असतातच. मग ते वाटीभर साखर घेणं असो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होणे असो. शेजारी म्हटलं अशा गोष्टी चालायच्याच. पण जर एखादा शेजारी तुमच्यासोबत भांडण झालं म्हणून तुमच्या घरात थेट साप सोडणारा असेल तर, होय असा भयानक प्रकार घरोघरच एकाने केला आहे. भांडण झालं म्हणून शेजाऱ्यांच्या घरात थेट नागिन आणि कोब्रा सोडला. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
तरुणाने शेजाऱ्यांच्या घरात नागिन अन् कोब्रा सोडला
ही घटना घडली आहे मध्य प्रदेशमधील विदिशाच्या कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील रंगियापुरा येथे. शेजाऱ्यांमधील वादाने भयानकच वळण घेतलं. रागाच्या भरात एका तरुणाने शेजाऱ्यांच्या घरात नागिन सोडली. शेजाऱ्याने त्या नागिनीला मारलं. मग त्या तरूणाने शेजाऱ्यांच्या घरात थेट कोब्रा सोडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रागाच्या भरात त्या तरुणाने केलेले हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्य वाटलं.
घाबरलेल्या तक्रारदाराने धाडस दाखवत सापाला पकडलं अन् थेट पोलीस स्टेशन गाठलं
जेव्हा आरोपीने शेजाऱ्याच्या घरात साप सोडला तेव्हा घाबरलेल्या तक्रारदाराने धाडस दाखवलं आणि त्या सापाला पकडलं आणि तसाच तो थेट पोलिस ठाण्यात गेला. पोलिस ठाण्यात साप पाहून पोलिसही हैराण झाले. परंतु तक्रारदाराने सांगितले की त्याच्या शेजाऱ्याने त्याला घाबरवण्याच्या आणि इजा करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात साप सोडले होते. प्रथम त्याने एका नागिनीला घऱात सोडलं आणि नंतर एका कोब्रा सापाला सोडलं. सुदैवाने कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही. पण होऊ शकला असता. हे ऐकून पोलिसही हैराण झाले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे
आरोपी सर्पमित्र असून तो साप पकडण्याचं काम करतो असं फिर्यादीने सांगितलं. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या अनोख्या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. आता वादात लोक दगड किंवा काठ्यांऐवजी आता सापांचा वापर करू लागलेत असंच काहीस चित्र दिसत आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत असून परिसरातील लोकांकडूनही अधिक माहिती गोळा करण्याचं काम करत आहेत.