
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, टॅरिफ लावून डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव निर्माण करून पाहात आहेत, मात्र आता भारतानं देखील अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भारतानं अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियासोबत व्यापार आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे, त्यांनी रशियन कंपन्यांना भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत करण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि रशियामधील आर्थिक संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले पाहिजेत असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
एस जयशंकर यांनी भारताची वेगानं वाढत असलेली अर्थव्यवस्था आणि मेक इन इंडियाचं उदाहरण देत, ही रशियन कंपन्यांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं म्हटलं आहे. भारतात झपाट्यानं शहरीकरण वाढत आहे, त्याचबरोबर नागरिकांची मागणी देखील वाढत आहे, त्यामुळे रशियन कंपन्यांसाठी भारतात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की भारताचा जीडीपी हा चार ट्रिलियन डॉलरपेक्षाही जास्त आहे. ज्याची ग्रोथ रेट सध्या सात टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. अशा स्थितीमध्ये रशियन कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ ही एक मोठी संधी आहे.
दरम्यान दुसरीकडे रशियाच्या भारतातील दूतावासाने देखील अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफला अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. जरी अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला असला तरी आम्ही भारतामधील वस्तुंचं रशियामध्ये स्वागत करू असं रशियन दुतावासानं म्हटलं आहे. दुसरीकडे चीन देखील आता भारतासोबत जवळीक वाढून पाहात आहे. त्यामुळे आता अमेरिकेचं हे टॅरिफ आस्त्र अमेरिकेवरच उलटण्याची शक्यता आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 ऑगस्टपासून हा टॅरिफ लागू होणार आहे. मात्र भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. आमच्यासाठी आमच्या देशाचं हीत महत्त्वाचं आहे, अशी भूमिका यावर भारत सरकारनं मांडली आहे.