Census 2027 : जनगणना कधी होणार? सरकारकडून अखेर तारखा जाहीर
Census 2027 Dates : केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय जनगणनेच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. देशभरात 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान ही जनगणना केली जाईल. मात्र बर्फाळ प्रदेशातील राज्य आणि ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांना या वेळापत्रकातून वगळण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणनेच्या (Census 2027) तारखा अखेर जाहीर केल्या आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात पुढल्या वर्षी म्हणजे, 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत जनगणनेचे काम पूर्ण केलं जाणार आहे. मात्र असं असलं तरी प्रशासकीय कारणं आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ज्या प्रदेशात बर्फवृष्टी होते तसेच ज्या राज्यांमध्ये आगामी निवडणुका आहेत, त्या काही राज्यांना या वेळापत्रकातून वगळण्यात आलं आहे.
भारतात जनगणनेची प्रक्रिया ‘जनगणना अधिनियम, 1948’ आणि ‘जनगणना नियम, 1990’ यानुसार पार पडतं. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादीही सरकारने यापूर्वीच जाहीर केली होती.
‘या’ राज्यांमध्ये वेगळं असणार जनगणनेचं वेळापत्रक
भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मणिपूरमध्ये ( पुढील घोषणा होईपर्यंत) जनगणनेबाबतची प्रक्रिया स्थगित राहणार आहे. तसेच गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, लडाख आणि हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरमधील बर्फवृष्टी होणाऱ्या भागांमध्येही या कालावधीत जनगणना होणार नाही. या भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. देशामधील उर्वरित राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढल्या वर्षी, 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान जनगणनेचं काम पूर्ण केलं जाईल.
यंदाच्या जनगणनेमध्ये नागरिकांना स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घराघरांत जाऊन जनगणनेची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी 10 जानेवारी ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती नोंदवता येईल. त्यामुळे जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
2021 साली होणार होती जनगणना, का झाली नाही ?
देशात, यापूर्वी 2011 साली जनगणना दोन टप्प्यांत जनगणना पार पडली. त्यानंतर 10 वर्षांनी, म्हणजेच 2021 साली दोन टप्प्यांत जनगणना करण्याचं नियोजन केंद्र सरकारने आखलं होतं. त्यानुसार, एप्रिल- सप्टेंबर 2020 या काळात पहिला टप्पा आणि फेब्रुवारी 2021 मध्ये दुसरा टप्पा होणार होता. यासाठी आवश्यक तयारीही पूर्ण करण्यात आली होती. 1 एप्रिल 2020 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती.
मात्र, याच काळात देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे 2021 मध्ये होणारी जनगणना प्रत्यक्षात पार पडू शकली नाही. आता केंद्र सरकारने 2027 मधील जनगणनेचं वेळापत्रक जाहीर केल्याने या प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.