‘महाराष्ट्र एप्सटिन फाईल्स’मध्ये अशोक खरातच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ दिग्गज मराठी अभिनेता, हिंदी सिनेमांमध्येही केलंय काम, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Epstein Files : 'महाराष्ट्र एप्सटिन फाईल्स' या सिनेमात भोंदू बाबा अशोक खरातच्या भूमिकेत कोण दिसणार हे समोर आलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून अशोक खरात प्रकरणातील घटनाक्रम मोठ्या पडद्यावर मांडला जाणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे या चित्रपटात अशोक खरातची भूमिका साकारणार आहेत.
अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपट
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप अशोक खरातवर करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्याने राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली. या प्रकरणाशी संबंधित राजकीय व्यक्तींसोबतचे काही फोटोही समोर आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
मनोज जोशी यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता
मनोज जोशी हे हिंदी आणि मराठी मनोरंजनविश्वातील अनुभवी अभिनेते आहेत. विविध चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ते अशोक खरातसारखी चर्चेतील व्यक्तिरेखा साकारणार असल्याची माहिती खरी ठरल्यास, त्यांच्या भूमिकेकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष आहे.
View this post on Instagram
सुबोध भावे आणि दीपाली सय्यद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटात सुबोध भावे आणि दीपाली सय्यद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याचं वृत्त यापूर्वी समोर आलं आहे. सुबोध भावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा आहे, तर दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. तसेच या सिनेमात अभिनेत्री माधुरी पवारही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
