
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव निर्माण करण्याची सध्या एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला, याचाच अर्थ आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. एवढंच नाही तर भारतानं आता रशियाकडून सुरू असलेल्या कच्च्या तेलाची आयात आणखी वाढवण्याची तयारी दाखवली आहे.
भारतानं रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करावं, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि ते पैसे रशिया हा युक्रेनसोबतच्या युद्धात फंड म्हणून उपयोग करतो असा आरोप अमेरिकेनं केला आहे. मात्र अमेरिकेकडून सुरू असलेल्या या आरोपांनंतर देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे, भारतानं घेतलेल्या या निर्णयाचा आता फायदा होताना दिसत आहे.
अमेरिकेसोबत भारताची चर्चा सुरू आहे, मात्र ही चर्चा सुरू असतानाच आता भारत रशियाकडून सुरू असलेल्या कच्च्या तेलाची आयात आणखी वाढवण्याची शक्यता आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं दिलेला मोठा धक्का मानला जात आहे.ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार रशिया आता कच्च्या तेलाच्या आयातीवर भारताला मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देणार आहे. रशिया एक नोव्हेंबरपासून भारताला खास ऑफर देणार आहे. प्रति बॅरलवर भारताला दोन ते अडीच डॉलरपर्यंत सूट मिळणार आहे. याचाच अर्थ अमेरिकेच्या टॅरिफमुळे जेवढं भारताचं नुकसान होत आहे, ते सर्व रशियाच्या या ऑफरमधून भरून निघणार आहे, सध्या रशियाकडून भारताला प्रति बॅरलमागे एक डॉलरची सूट मिळत आहे, आता ही सूट वाढून प्रति बॅरल दोन ते अडीच डॉलर म्हणजे दुप्पट होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून टॅरिफ लावला, मात्र आता त्यांचा हा डाव त्यांच्यावर उलटताना दिसत आहे. तसेच यामुळे अमेरिका आणि भारतामधील संबंध अधिक ताणले गेले आहेत, दुसरीकडे रशिया आणि भारताची जवळीक वाढत आहे.