9 ते 11 सप्टेंबरदरम्यान मोठा धोका, प्रशासनाकडून अलर्ट जारी, भारतीय हवामान विभागाचा इशारा

मागील काही दिवसांपासून देशभरात जोरदार पाऊस सुरू आहे. फक्त हेच नाही तर अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्यांना पूर आलाय. पावसाने इतका जास्त कहर केला आहे की, कित्येक हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झाले.

9  ते 11 सप्टेंबरदरम्यान मोठा धोका, प्रशासनाकडून अलर्ट जारी, भारतीय हवामान विभागाचा इशारा
Rain
| Updated on: Sep 08, 2025 | 1:08 PM

मागील काही दिवस राज्यात पावसाचा जोर दिसला. बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशीही पाऊस अनेक भागांमध्ये झाला. आताही हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा येलो अलर्ट दिलाय. देशभरात पाऊस धुमाकूळ घालताना दिसतोय. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. यावर्षी मान्सून हंगामात देशभरात मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे धरणे, नद्या आणि तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र, देशातील काही भागात पाऊस इतका जास्त सुरू आहे की, लोकांचे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. पिकांचेही मोठे नुकसान होत असून शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. सध्या देशात पावसाचा सर्वात जास्त फटका हा पंजाबमध्ये बसलाय.

पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर सुरू असतानाच आता भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी परत एकदा मोठा इशारा दिलाय. राजस्थानच्या पाली, जोधपूर, बारमेर, जालोर, सिरोही, उदयपूर या भागात पावसाचा इशारा दिला असून लोकांना सतर्क राहण्यासही सांगितले. हेच नाही तर पावसाच्या या अंदाजानंतर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे निर्णय घेत थेट सरकारी आणि खासगी कार्यालये. शाळा यांना सुट्टी जाहीर केली.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राजस्थानच्या विविध भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे, दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जातंय. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पाऊस होऊ शकतो. तर 11 ते 12 सप्टेंबरला ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस होईल. इतक्या मोठ्या पूरानंतरही पंजाबमध्ये पावसाचा धोका हा कायम आहे.

पंजाबमध्ये पुरामुळे परिस्थिती भयानक आहे. पंजाबचे सर्व 23 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. असंख्य गावे पाण्याखाली बुडाली आहेत. सुमारे 4 लाख लोक पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. या पावसामुळे अनेक हेक्टर पिकांचे नुकसान देखील झाले. उत्तराखंडमध्ये आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. डेहराडून, हरिद्वार, जोशीमठ, लॅन्सडाउन, मसूरी शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हेच नाही तर लोकानी नद्यांपासून दूर राहण्याचे आदेशही प्रशासनाने दिली आहेत.