
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र भारत आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अफगानिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांचं गुरुवारी फोनवर बोलणं झालं. मात्र या फोनमुळे आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयशंकर आणि मुत्ताकी यांनी भारताच्या मदतीनं अफगाणिस्तामध्ये सुरू असलेले प्रकल्प पुढे नेण्यास सहमती दर्शविली आहे. या विकास प्रकल्पांमध्ये काबूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या शहतूत धरण प्रकल्पाचा देखील समावेश आहे. 2021 लाच या संदर्भात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये एक करार झाला होता, मात्र अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर या कराराला ब्रेक लागला होता.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आता या करारावर चर्चा सुरू झाली आहे.काबूल नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी भारत अफगाणिस्तानला 236 मिलियन डॉलर रुपयांची मदत करणार आहे, तसेच तांत्रिक मदत देखील पुरवणार आहे. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे काबूल आणि परिसरात राहणाऱ्या तब्बल 20 लाख लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणार आहे, तसेच अफगाणिस्तानची तब्बल चार हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, मात्र हे धरण अफगाणिस्तामध्ये झालं तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दुष्काळ पडू शकतो. खैबर पख्तूनख्वामध्ये जाणारं सर्व पाणी या धरणामुळे अडवलं जाणार आहे.
तर दुसरीकडे भारतानं सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अंवलंबू आहे. अशा पद्धतीने आता भारत पाकिस्तानची दुहेरी कोंडी करू शकतो. सिंधू पाणी वाटप करार स्थगिताचा पुनर्विचार करावा यासाठी पाकिस्तानकडून भारताला एक पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. करार स्थगिताचा पुनर्विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे.