Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
भारतात साखरेचे दर अचानक 40% वाढले आहेत. कमी उत्पादन, सणांमुळे वाढलेली मागणी, पिकांचे नुकसान आणि काळाबाजार ही या दरवाढीमागची मुख्य कारणे आहेत. इथेनॉलमुळे भाववाढ झाल्याचा समज असला तरी, सरकारी आकडेवारीनुसार त्याचा संबंध कमी असल्याचं दिसतंय. मात्र, असं असलं तरी साखरेचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांवर याचा मोठा आर्थिक भार पडत आहे.

ऐन सणउत्सवाच्या काळात साखरेचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. एकीकडे कांद्याचे तर वाढले. दुसरीकडे साखरही कडू झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात साखरेच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही ठिकाणी 70 ते काही ठिकाणी 80 रुपये किलोने साखर विकली जात आहे. देशांतर्गत साखर पुरवठा कमी झाल्याने साखरेचे दर वाढल्याचं सांगितलं जात आहे. तर काही लोक साखर महागण्यात इथेनॉलचं कनेक्शनही जोडत आहेत. त्यामुळे साखर नेमकी कशामुळे महागली? त्यामागची काय आहेत कारणं? याचा घेतलेला आढावा.
सुरुवातीचा अंदाज काय?
2025-2026 मध्ये साखरेच्या सुरुवातीच्या सीजनमध्ये चित्र काही वेगळं होतं. यंदा साखरेचं उत्पादन प्रचंड वाढेल असं सरकार आणि साखर उद्योगाला वाटत होतं. सुरुवातीला 34.9 मिलियन टन साखरेचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज होता. पर्याप्त स्टॉक असल्याने सरकारने साखर निर्यातीला हिरवा कंदीलही दिला होता.
कुठं चुकलं? संकट कसं आलं?
पण जसजसा सीजन पुढे सरकला तसं तसं साखर उत्पादनाचा अंदाज चुकीचा ठरू लागला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या सर्वाधिक साखर उत्पादक राज्यांमध्ये कमी उत्पादन, पावसामुळे पिकांचं नुकसान आणि रेड रॉट तसेच टॉप बोरर सारख्या रोगांमुळे साखरेचं उत्पादन प्रभावीत झालं. सरकारचा आताचा अंदाज केवळ 30.6 मिलियन टन साखर उत्पादनाचा आहे.
सोबतच सणासुदीत साखरेची मागणी वाढली आहे. ऑगस्टमध्ये विक्रीचा कोटा वाढवण्याऐवजी गेल्या वर्षी एवढा म्हणजे 2.25 मिलियन टन ठेवला आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठ्यावरून दबाव अधिक वाढणार आहे.
10 लाख टन साखर आयातीला मंजुरी
परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सरकारने 19 ऑगस्ट रोजी मोठ्या औद्योगिक खरेदीदारांसाठी स्टॉक लिमिट मर्यादीत आणि कठोर केली आहे. त्यानंतर एका दशकानंतर पहिल्यांदाच साखर आयात करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 20 ऑगस्ट रोजी 10 लाख टन साखर आयात करण्याची केंद्राने परवानगी दिली आहे. त्यानंतर काही कारखान्यांमध्ये साखरेच्या किंमती 7,100 रुपये प्रति क्विंटलवर गेल्या आहेत.
इथेनॉलसाठी साखरेचा वापर झाल्याने केवळ साखरेचे भाव वाढलेले नाहीत. तर कमी उत्पादन, सणांच्या काळातील साखरेची वाढती मागणी, पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान आणि बाजारातील घडामोडींमुळे साखरेचे दर वाढल्याचं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने आता देशांतर्गत साखरेची उपलब्धता आणि किंमतीवर सातत्याने नजर ठेवली आहे. सणांच्या काळात साखरेचे दर अधिक वाढू नये आणि सामान्य नागरिकांवर महागाईचा बोज वाढू नये हा त्यामागचा हेतू आहे.
साखरेचे दर अचानक कसे वाढले?
साखरेचे दर अचानक कसे वाढले? यावर राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष तसेच राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साखरेचे दर अचानक वाढल्याने आम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का आहे. केंद्र सरकारपासून आम्ही सर्वजण याचा गांभीर्याने विचार करत आहोत. साखरेच्या दरात 8 ते 10 रुपयांची वाढ कशी झाली? याचा आम्ही विचार करत आहोत. वास्तविक पाहता ऑगस्ट महिन्याचा 22 लाख मॅट्रीक टनाचा कोटा शासनाने रिलीज केला आहे. साधारणत: 20 ते 22 लाख टन साखर घरकामासाठी लागते. पण अचानकपणे हे दर कसे काय वाढले? ही आश्चर्याची गोष्ट आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
केंद्र सरकारने साखर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर संघ, खासगी साखर कारखाने या संस्थांनी केंद्र सरकारच्या सचिवांबरोबर मिटिंग केली. हा साखर उद्योग सरकार सोबत आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शेतकरी आणि सरकार देखील महत्त्वाचं आहे. अल निनोचा परिणाम दिसायला लागला आहे. त्यामुळे उद्योगावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्वांनी समजूदारपणाने निर्णय घ्यावा आणि सरकारला सहकार्य करावे, असं पाटील म्हणाले.
10 वर्षानंतर साखर आयातीची वेळ
काही ठिकाणी पाऊस झाला आणि पश्चिम महाराष्ट्राती सगळी धरणं भरली. साखर उद्योग हा निसर्गावर अवलंबून असलेला आहे. काही लोक आरोप करतात की इथेनॉलकडे ऊस गेल्यामुळे साखरेचा तुटवडा झाला. त्यामुळे गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच आपल्याला साखर आयात करण्याची वेळ आली आहे. पण 28 टक्के इथेनॉल निर्मिती साखरेच्या मॉलिसीसमधून झाली आहे. त्यामुळे 25 ते 30 लाख टन साखर डायव्हर्ट झाली. उसाचं उत्पादन कमी होऊ लागलेलं आहे. साखरेला पण पर्याय तयार झाले आहेत. इथून पुढची धोरणं ठरवताना 5 ते 10 वर्षाची एक स्टेबल पॉलिसी सातत्याने ठेवावी लागणार आहे. साखर आपण एक्सप्रोर्ट करतोय आणि इम्पोर्ट करतोय, याचं बारकाईने नियोजन करणं गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.
इथेनॉलचा संबंध किती?
इथेनॉलसाठी साखर वापरल्याने साखरेचे भाव वाढल्याची देशात चर्चा आहे. पण सरकारी आकडेवारी काही वेगळंच सांगत आहे. 2022-2023मध्ये इथेनॉलसाठी केवळ 11.5 टक्के साखर वापरली गेली. त्यानंतर 2024-2025मध्ये इथेनॉलसाठी साखरेच्या वापरात 11 टक्के घट झाली. तर 2025-2026मध्ये हा वापर 9 टक्क्याने घटला. भारतात तीन तृतियांश इथेनॉल हा साखरेपासून नव्हे तर धान्यापासून त्यातही मक्क्यापासून बनतो. त्यामुळे साखरेचे दर वाढण्यामागे इथेनॉलचा संबंध लावणं गैर आहे.
साखरेचे दर वाढण्यामागची सहा कारणं?
अंदाजापेक्षा देशांतर्गत साखरेचं कमी उत्पादन झालं.
सण उत्सव सुरू होण्याच्या आधीच साखरेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली.
काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहिल्याने उसाचं नुकसान झालं.
रेड रॉट आणि टॉप बोरर सारख्या रोगांचा प्रादूर्भाव
जगभरात साखरेची सप्लाय चैन विस्कळीत झाली
काही साखर कारखाने आणि उद्योजकांनी साखरेचा काळाबाजार आणि साठवणूक केली
सोलापुरात पोलीस बोलावले
काही महिन्यांपूर्वीच पेट्रोल-डिझेल-गॅससाठी रांगा लागल्यानंतर आता साखरेसाठीही रांगा लावण्याची वेळ येते की काय, अशी चित्र दिसू लागलीयत… सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यातही असंच चित्र दिसलं. साखरेसाठी सभासदांनी तुंबळ गर्दी केली, इथे प्रत्येक सभासदाला 50 किलो साखर देण्यात येत होती. ही बातमी बाहेर जाताच कारखाना परिसरात प्रवंड गर्दी झाली. अखेर गर्दी आवरण्यासाठी कारखाना प्रशासनाला पोलिसांना बोलवावं लागलं…..
एका व्यक्तीला फक्त दोन किलो साखर
बुलडाण्यातल्या स्मार्ट बाजारतही तेच चित्र आज पाहायला मिळालं. जिथं एरव्ही अत्यंत कमी दरात साखर हवी तितकी मिळते, तिथंही आता एका व्यक्तीला फक्त दोन किलो साखर मिळेल म्हणून फलक लागलेयत… सणासुदीला फक्त गोडधोड पदार्थांसाठीच किलो-दोन किलो साखर लागते… अशावेळी दोन किलो साखरेत काय होणार? हा प्रश्न महिलांपुढे आहे
विरोधाभास हा आहे की, साखरेचे भाव काही दिवसातच 48 वरुन 75 ते 80 च्या घरात गेलेत…. दुकानांमध्ये फक्त दोनच किलो साखर मिळेल म्हणून बोर्ड लागलेयत.. कारखान्यांबाहेर साखरेसाठी गर्दी होतेय, आणि दुसरीकडे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही संस्था मात्र देशात साखरेची कोणतीही कमतरता नसल्याचं सांगत आहे, विशेष बाब म्हणजे स्वतः सरकारनं केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरीही दिलीय
ज्यूसपासून केकपर्यंत सर्वच महाग
साखरेमुळे चहापासून कॉपीपर्यंत, फळांच्या ज्यूसपासून केकपर्यंत आणि मिठाईपासून ते बहुतांश खाद्यपदार्थे दर वाढायला सुरुवात झाली आहे. साखरेची साठेबाजी होवू नये म्हणून सरकारनं पथकं बनवलीयत. मात्र पुरवठा कमी झाल्यावर मागणी वाढते या न्यायानं काही ठिकाणी लोक सणाच्या तोंडावर जास्तीची साखर खरेदी करु लागलेयत.
