लाईव्ह IPL पाहण्याच्या नादात थार विहिरीत कोसळली; 2 मित्र खिडकी तोडून वाचले, पण सीट बेल्टमुळे चालकासोबत जे घडलं…

आरसीबीच्या आयपीएल २०२६ मधील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरू असतानाच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार गाडी विहिरीत कोसळली, ज्यामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर वृत्त.

लाईव्ह IPL पाहण्याच्या नादात थार विहिरीत कोसळली; 2 मित्र खिडकी तोडून वाचले, पण सीट बेल्टमुळे चालकासोबत जे घडलं...
thar accident
| Updated on: Jun 02, 2026 | 7:46 AM

देशभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार अखेर संपला आहे. अत्यंत अटीतटीच्या, रोमांचक आणि हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने गुजरात टायटन्स (GT) संघावर मात करत आयपीएल २०२६ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण बंगळूरसह जगभरातील आरसीबी चाहत्यांमध्ये प्रचंड जल्लोष सुरू आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावून लीगच्या इतिहासात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकीकडे संपूर्ण देश या महाविजयाच्या उत्साहात बुडाला असताना, दुसरीकडे दोन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आल्या आहेत. तेलंगणामध्ये मॅच पाहण्याच्या नादात झालेल्या रस्ते अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे, तर आंध्र प्रदेशात क्रिकेटच्या सेलिब्रेशनला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.

मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहणे बेतले जीवावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या जगतीयाल जिल्ह्यातील मोरापल्ली गावाच्या वेशीवर एक भीषण अपघात घडला. निवेश, अश्विन आणि अरुण हे तीन तरुण एका महिंद्रा थार (Thar) गाडीतून प्रवास करत होते. प्रवास करत असताना हे तिन्ही तरुण त्यांच्या मोबाईल फोनवर आयपीएलचा अंतिम सामना लाईव्ह पाहत होते.

गाडी चालवण्याची जबाबदारी अरुणकडे होती. मात्र, त्याचे लक्ष रस्त्याऐवजी पूर्णपणे मोबाईलच्या स्क्रीनवर आणि मॅचच्या रोमांचक वळणावर होते. मॅच पाहत असतानाच अरुणचे भरधाव वेगातील थार गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर त्यांची गाडी कडेला असलेल्या एका खोल विहिरीत जाऊन कोसळली. गाडी विहिरीत कोसळल्यानंतर ती पाण्यात पूर्णपणे उलटी झाली. गाडीत अडकलेले इतर दोन तरुण निवेश आणि अश्विन गंभीर जखमी झाले होते, तरीही त्यांनी अत्यंत हुशारीने गाडीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि पाण्यातून बाहेर पडत आपला जीव वाचवला.

मात्र, चालक अरुणने सुरक्षेसाठी सीट बेल्ट घातला होता, जो त्याच्या अपघाताचा काळ ठरला. गाडी उलटी झाल्यामुळे आणि पाण्याचा प्रचंड दाब असल्यामुळे ऐनवेळी त्याला स्वतःचा सीट बेल्ट काढता आला नाही. परिणामी, तो गाडीबाहेर येऊ शकला नाही आणि विहिरीतील पाण्यात बुडून त्याचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. अखेर क्रेन बोलवण्यात आली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ती थार गाडी आणि चालक अरुणचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. तसेच जखमी तरुणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Follow Us