
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी भीषण स्फोट झाला, या स्फोटामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, तर या घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर आता तपास यंत्रणांकडून धडपकड सुरू झाली आहे. या प्रकरणातील दुसरी संशयित कार देखील पोलिसांच्या हाती बुधवारी लागली. ही इकोस्पोर्ट कार असून, ती फरिदाबाद पोलिसांना खंदावली गावाजवळ आढळून आली आहे. ही कार देखील उमरच्या नावावर आहे. उमर हा या कारचा दुसरा मालक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दिल्लीमध्ये स्फोट होताच आता वेगवेगळ्या देशांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. या स्फोट प्रकरणात सर्वात पहिली प्रतिक्रिया इस्रायल आणि अफगाणिस्तानमधून आली आहे. इस्रायलने या स्फोटाचा निषेध केला आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी या स्फोटावर प्रतिक्रिया देताना दहशतवाद विरोधी लढ्यात आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने देखील या स्फोटावर दु:ख व्यक्त केलं आहे. तालिबानकडून देखील या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. हा स्फोट झाल्यानंतर सर्वात आधी प्रतिक्रिया इस्रायल आणि तालिबानकडून आली आहे. काही दिवसांपूर्वीच तालिबान सरकारने परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता अफगाणिस्तानकडून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे इस्रायल हा भारताचा एक चांगला मित्र असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
इस्त्रायलने नेमकं काय म्हटलं?
भारतामध्ये स्फोट होताच सर्वात पहिली प्रतिक्रिया इस्रायलकडून आली आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारतामध्ये जी स्फोटाची घटना घडली, त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. मी इस्रायलच्या वतीने त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या घटनेत जे जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या या लढाईमध्ये इस्रायल भारताच्या सोबत आहे, असं इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.