
पहलगाम हल्ला, त्याच्या बदल्यासाठी सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर, खवळलेल्या पाकचं प्रत्युत्तर आणि भारताने पाकला शिकवलेला धडा.. इथपर्यंतच प्रवास सगळ्यांनीच आत्तापर्यंत पाहिला आहे. गेले काही दिवस भारत-पााकमध्ये सतत तणावाचं वातावरण होतं, मात्र त्यानतंर सीजफायर झालं. असं असली तरीही सरकारच्या सांगण्यानुसार, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. तसेच दुसरीकडे, पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची मोहीम देखील तीव्र होत आहे.त्याचअंतर्गत आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) Amazon आणि Flipkart यांच्यासह ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावली आहे आणि त्यांना पाकिस्तानशी संबंधित झेंडे आणि वस्तू काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. भारताने पाकिस्तानला सीमेवरील हल्ल्यांना जोरदार झटका देऊन गुडघे टेकायला लावले होते आणि आता ते त्यांच्यावर आर्थिक आघात करून त्यांच्या अडचणी सतत वाढवत आहे.
पाकशी निगडीत सामानवर त्वरित बंदी…
ई-कॉमर्स साइट्सवर पाकिस्तानी ध्वज आणि इतर संबंधित वस्तूंची विक्री हेनियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि सर्व कंपन्यांनी ते तात्काळ प्रभावाने काढून टाकावेत, असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी) म्हटले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने देखील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून यासंबंधी चिंता व्यक्त केली होती. भारत-पाकिस्तान तणाव आणि संघर्ष असूनही, देशातील ई-कॉमर्स साइट्सवर पाकिस्तानी झेंडे आणि इतर वस्तू मुक्तपणे विकल्या जात असल्याचे त्यात नमूद करण्यात आलं होतं. यानंतर, सीसीपीएने आता या प्रॉडक्ट्सची विक्री तत्काल थांबवण्याची नोटीस बजावली आहे.
प्रल्हाद जोशींनी शेअर केली माहिती
पाकिस्तानी वस्तूंच्या विक्रीविरुद्ध सीसीपीएच्या निर्देशांशी संबंधित माहिती ही, कन्झ्युमर अफेर्स मिनिस्टर ( ग्राहक व्यवहार मंत्री) प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. ‘सरकारने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवली आहे. या कंपन्यांवर त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तू विकल्याचा आरोप आहे.’असे त्यांनी लिहीलं. ‘ ही असंवेदनशीलता आहे आणि अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना अशी उत्पादने तात्काळ काढून टाकण्याचे आणि देशातील कायद्यांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’ असंही त्यांनी पुढे पोस्टमध्ये नमूद केलं.
भारताच्या कारवाईने पाकचा जळफळाट
गेल्या महिन्यात, 22 एप्रिल रोजी श्रीनगरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने 6-7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये सुमारे 100 दहशतवादी मारले गेले. यापूर्वी, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तात्काळ कारवाई करत सिंधू पाणी करार स्थगित करून पाकिस्तानवर जलप्रहार केला होता, तसेच अटारी सीमा बंद केल्यानेही पाकला मोठा आर्थिक फटका बसला होता. आता सीझफायरनंतरही भारताकडून सतत कारवाई सुरू आहे.
पाकची साथ देणाऱ्यावंरही बॉयकॉट
भारतात केवळ पाकिस्तानविरोधी लाटच नाही तर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांविरुद्धही भारतात बहिष्कार मोहीमही तीव्र आहे. या प्रकरणात, तुर्की हे सर्वात मोठे लक्ष्य आहे आणि Boycott Turkey या मोहिमेद्वारे व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद खरेदी करणे थांबवले आहे. तसेच पर्यटनावर अवलंबून असलेल्या तुर्कीसाठी अनेक ट्रॅव्हल एजन्सींनीही प्रवास पॅकेजेस रद्द केले आहेत.
EaseMyTrip या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ने तर ‘राष्ट्र प्रथम, व्यवसाय नंतर’ हा नारा देत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये प्रवास करू नका असा सल्ला प्रवाशांना दिला आहे. अझरबैजान आणि तुर्कीयेसाठी झालेल्या बुकिंगमध्ये 60% घट नोंदवली आहे, तर एका आठवड्यात 250 % कॅन्सलेशन वाढली आहेत, असे MakeMyTrip ने सांगितलं.