Jammu Blast: जम्मू एअरफोर्स स्टेशनवर हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर? एअर मार्शल दौऱ्यावर, NSG, NIA टीमही दाखल

| Updated on: Jun 27, 2021 | 12:39 PM

जम्मू एअरफोर्स स्टेशनवर झालेले स्फोट हा दहशतवादी हल्ला आहे का याबद्दल अजून तरी स्पष्ट अशी माहिती दिली गेलेली नाही. पण हल्ल्यात स्फोटकं वापरण्यासाठी ड्रोनचा वापर झाला असावी अशी शंका बळावत चालली आहे

Jammu Blast: जम्मू एअरफोर्स स्टेशनवर हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर? एअर मार्शल दौऱ्यावर, NSG, NIA टीमही दाखल
जम्मूतल्या एअरफोर्स स्टेशनमध्ये दोन स्फोट
Follow us on

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचं नियोजन केंद्र सरकार करत असतानाच जम्मूतल्या एअरफोर्स स्टेशनमध्ये दोन छोटेसे स्फोट झालेत. 26-27 जूनच्या मध्यरात्री पाच मिनिटाच्या अंतरानं हे स्फोट घडलेत. हे स्फोट दहशतवाद्यांनी घडवलेत की आणखी कुठल्या कारणानं घडलेत याचा तपास सुरु आहे. NIA ची टीम जम्मू एअरफोर्स स्टेशनवर पोहोचलीय. (Jammu and Kashmir Explosion heard inside Jammu airport’s technical area)

नेमकं काय घडलं?

काही तासांपूर्वी मध्यरात्रीनंतर जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनवर दोन स्फोट झालेत. ह्या स्फोटाची तीव्रता कमी होती पण ज्या पद्धतीनं ते झालेत ते मात्र गंभीर आहेत. दोन्ही स्फोट पाच मिनिटाच्या फरकानं झालेत. पहिला स्फोट हा एअरफोर्सच्या एका इमारतीच्या छतावर 1 वाजून 37 मिनिटांनी झाला तर दुसरा स्फोट 1 वाजून 42 मिनिटांनी. पहिला स्फोट छतावर झाला असला तरी दुसरा मात्र मोकळ्या जागेत झाला. यात सूत्रांच्या माहितीनुसार दोन जवानांना मामुली स्वरुपाच्या जखमा झाल्यात. स्फोटानंतर काही वेळातच सुरक्षा जवानांनी संपूर्ण भागाची घेराबंदी केली. इंडियन एअरफोर्सनं ट्विट करत माहिती दिली की, कुठल्याही उपकरणांना हाणी झालेली नाही. तसच सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु आहे.

दहशतवादी हल्ला ?

जम्मू एअरफोर्स स्टेशनवर झालेले स्फोट हा दहशतवादी हल्ला आहे का याबद्दल अजून तरी स्पष्ट अशी माहिती दिली गेलेली नाही. पण हल्ल्यात स्फोटकं वापरण्यासाठी ड्रोनचा वापर झाला असावी अशी शंका बळावत चालली आहे. IED हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर झाल्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. जम्मू एअरफोर्स स्टेशनपासून बॉर्डर 14 किलोमीटर दूर आहे आणि ड्रोनचा वापरत करत असा हल्ला 12 कि.मी.पर्यंत करता येऊ शकतो. तसाच IED चा वापर करत हा हल्ला केला असावा अशी शक्यता वर्तवली जातेय.

काय होतं टार्गेटवर?

पहिला स्फोट इमारतीच्या छतावर आणि दुसरा स्फोट हा मोकळ्या जागेत झाला असला तरीसुद्धा टार्गेटवर मात्र एअरफोर्सची विमानं असावीत असाही संशय आहे. प्रत्यक्षात कुठल्याच विमानाचं नुकसान झालेलं नाही. अशा हल्ल्यात ज्या ड्रोनचा वापर केला जातो, ती सहसा रडारवर येत नाहीत, त्यामुळेही हा हल्ला होताना तो लक्षात आला नाही. ड्रोननं हल्ला झाल्याची बळकटीही त्यावरुनच होतेय. ह्या हल्ल्यानंतर पठाणकोट, अंबाला, अवंतीपुरा इथल्या एअरबेसवरही अलर्ट जारी करण्यात आलाय.

देशातला पहिला ड्रोन हल्ला

सूत्रांच्या माहितीनुसार-एअरफोर्सच्या पेट्रोलिंग टीमनं हा हल्ला होताना पाहिला. स्फोटकं पडत असताना त्यांना दिसले. त्यामुळेच हा ड्रोन हल्ला होता यावर जास्त भर दिला जातो आहे. त्यावर शिक्कामोर्तब झालं तर ड्रोननं झालेला हा देशातला पहिला हल्ला असेल. यापूर्वी असा हल्ला देशाच्या कुठल्याच सुरक्षा स्थळावर झालेला नाही.

संरक्षण मंत्र्यांचा फोन

जम्मू स्फोटानंतर दिल्लीतही घडामोडींना वेग आलाय. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्हाईस एअर चीफ मार्शल एचएस अरोडा यांच्याशी चर्चा केली. घटनेची संपूर्ण माहिती घेतली. वेस्टर्न कमांडचे दुसरे सर्वात सिनिअर अधिकारी एअर मार्शल विक्रमसिंग हे जम्मू पोहोचतायत. इतर
एअरफोर्सचे अधिकारीही जम्मूला पोहोचलेत. एअरफोर्सचीही एक हाय लेवल टीम तपास करणार असल्याचं समजतं.

संबंधित बातम्या :

VIDEO: जम्मू-काश्मीमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF वर ग्रेनेड हल्ला, 3 जण जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

लाहोर हादरलं, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट, 12 जखमी

(Jammu and Kashmir Explosion heard inside Jammu airport’s technical area)