
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बाबरी मशीद आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण होऊ शकतो. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलय. पंडित जवाहरलाल नेहरुंना जनतेच्या पैशाने पुन्हा बाबरी मशीद बनवायची होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला. तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी ही योजना यशस्वी होऊ दिली नाही. म्हणूनच बाबरी मशीद पुन्हा उभी राहू शकली नाही असं राजनाथ सिंह म्हणाले. ते गुजरातच्या बडोदा शहरात बोलत होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुजरातच्या सडली गावात आयोजित एका युनिटी मार्चच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. “आज आपण ज्या महापुरूषाचं 150 जयंती वर्ष साजर करत आहोत, ते भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधणारे नायक आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची भूमिका आणि त्यांचं निर्णायक नेतृत्व यासाठी देश त्यांना नेहमी लक्षात ठेवेल” असं राजनाथ सिंह म्हणाले.
“नेहरु यांनी पब्लिक फंडातून बाबरी मशीद बांधण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी सरदार पटेल यांनी या योजनेला स्पष्टपणे नकार दिला. त्यावेळी सरदार पटेल यांनी सरकारी पैशाने बाबरी मशीद बांधू दिली नाही. त्यानंतर नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर सरदार पटेल यांनी हा वेगळा विषय आहे, असं उत्तर दिलेलं” असं राजनाथ सिंह म्हणाले. तिथे 30 लाख रुपये जनतेने दान केलेले. ट्रस्ट बनवण्यात आली. या कामात एकाही सरकारी पैशाची गरज लागली नाही.
त्यांचा वारसा दडपण्याचा प्रयत्न झाला
“पटेल यांच्या निधनानंतर जो पैसा जमा झालेला, तो नेहरु यांनी विहिरी आणि रस्ते बनवण्यासाठी खर्च करावा असा सल्ला दिलेला. त्यांचा वारसा दडपण्याचा प्रयत्न झाला. पटेल खऱ्या अर्थाने उदार आणि निष्पक्ष नेते होते. त्यांनी कधीच तृष्टीकरणाचं राजकारण केलं नाही” असे दावे राजनाथ सिंह यांनी केले. “1946 साली अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नेहरु यांना अधिक मते मिळाली. पण गांधीजींच्या सांगण्यावरुन पटेल यांनी आपलं नाव मागे घेतलं आणि नेहरु अध्यक्ष झाले. त्यानंतर ते पंतप्रधान बनले” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.