JPSCच्या वादग्रस्त चेअरमनला अटक, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई; छापा मारल्यावर…

जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या अटकेमुळे रांचीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घोटाळ्याविरोधातील आंदोलनाला बळ मिळाले आहे. सीआयडी तपासानंतर ही मोठी कारवाई झाली असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.

JPSCच्या वादग्रस्त चेअरमनला अटक, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई; छापा मारल्यावर...
JPSC Chairman L Khiangte
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 3:23 PM

रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आली आहे. सीआयडीने JPSC चे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना अटक केली आहे. जेपीएससीचे अध्यक्ष असताना खियांगते यांनी ब्लॅकलिस्टेड एजन्सीला टीडीपीएलचं काम दिल्याचा आणि कथितपणे त्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. सीआयडीने छापा मारल्यानंतर खियांगते यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. आता सीआयडीने चार तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांची अटक केली आहे.

सीआयडीने या प्रकरणात अभय तिवारी याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केल्यावर सीआयडीच्या हाती काही धागेदोरे लागले होते. या सर्वांची सीआयडीने संगत लावली आणि नंतर खियांगते यांना अटक केली. ओएमआर शीटमध्ये कथितपणे छेडछाड करणं आणि परीक्षा माफियांशी साटंलोटं केल्याच्या आरोपानंतर खियांगते यांना अटक केली आहे. गेल्या महिन्यात 22 जुलै रोजी खियांगते यांनी राजीनामा दिला होता. सीआयडीने छापा मारल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला होता.

राज्याचे मुख्य सचिवही होते

खियांगते हे 1988 बॅचचे झारखंड कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहे. ते राज्याचे मुख्य सचिवही होते. झारखंड परीक्षा घोटाळा प्रकरणात एका परीक्षा संचालक एजन्सीच्या अकाऊंटंटसहीत एकूण 19 लोकांना अटक करण्यात आली होती.

रांचीमधील आंदोलन पेटलं

दरम्यान, रांची येथे सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. आज आंदोलनाचा 17 वा दिवस आहे. आज विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घालण्यासाठी विधानसभेच्या दिशेने कूच केलं. यावेळी विधानभवनाकडे जाणाऱ्या मार्गात लागलेल्या सहा बॅरेकेडिंग तोडून विद्यार्थी कूच करत होते. विद्यार्थ्यांना अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण विद्यार्थी अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. मात्र, विद्यार्थ्यांनी पाण्याचा मारा सुरू होताच नाचायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी नंतर विद्यार्थ्यांवर लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले असून मागण्या मान्य झाल्याशिवाय जागेवरून हटणार नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी ही मुख्य मागणी या विद्यार्थ्यांची आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us