Pahalgam Terror Attack : पतीवर गोळ्या झाडताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका; दहशतवादी म्हणाला…; हृदय पिळवटून टाकणारी घटना
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील बिझनेसमन मंजुनाथ राव यांनी आपले प्राण गमावले. पत्नी पल्लवी यांच्या डोळ्यांसमोर मंजुनाथ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. पतीला मारल्यानंतर पल्लवी दहशतवाद्यांना म्हणाल्या, मलाही मारून टाका. तेव्हा दहशतवादी म्हणाला..

काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कर्नाटकातील एका व्यावसायिकाचाही समावेश होता. मंजुनाथ राव असं त्यांचं नाव होतं. ते तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलासह जम्मू-काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. मुलाला पीयूच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ते तिघं काश्मीरला गेले होते. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात राव यांच्या कुटुंबीयांनी आपलं सर्वस्व गमावलंय. पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी मंजुनाथ यांना गोळ्या झाडल्या. एका दुकानदाराशी ते बोलत असताना दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. अतिरेक्यांनी मंजुनाथ यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. पतीला आपल्या डोळ्यासमोर प्राण गमावताना पाहून मंजुनाथ यांच्या पत्नीने “मलाही मारून टाका..” असं दहशतवाद्यांना म्हटलं होतं.
मंजुनाथ आणि त्यांचे कुटुंबीय 19 एप्रिल रोजी काश्मीरसाठी रवाना झाले होते. ते 24 एप्रिलला काश्मीरहून शिवमोग्गाला परतणार होते. एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी ही ट्रीप बुक केली होती. हल्ल्यानंतर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग सांगितला. “माझ्या मुलाने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. माझा पती एका दुकानदाराशी बोलत होता, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यांनी माझ्या पतीच्या डोक्यात गोळी झाडली. जेव्हा मी आणि माझा मुलगा त्यांच्याजवळ गेलो, तेव्हा त्यांनी आपले प्राण गमावले होते. मी दहशतवाद्यांना ओरडून म्हणाले की, तुम्ही माझ्या पतीला मारलंत, मलाही मारून टाका. माझ्या मुलानेही तेच म्हटलं. पण तो अतिरेकी म्हणाली, नाही मारणार.. मोदीला जाऊन सांग. ही भयानक घटना तू मोदीला जाऊन सांगावं यासाठी तुला सोडून देतोय, असं म्हणून तो तिथून निघून गेला”, असं त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मंजुनाथ आणि त्यांची पत्नी पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. मंजुनाथ यांच्या पत्नीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटनस्थळांची माहिती देताना दिसत आहेत. या हल्ल्यात किमान 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे.
