
Pahalgam Terror Attack :जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हादरवून टाकणाऱ्या हल्ल्यानंतर तिथल्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. सध्या केरळमधील एका कुटुंबाची अशीच एक गोष्ट सगळीकडे चर्चेचा विषय ठरलीय. दैव बलवत्तर म्हणून केरळमधील 11 सदस्यीय कुटुंब बचावले आहे. विशेष म्हणजे मटणात मीठ जास्त झाल्याने या सर्वांचा जीव वाचला.
या कुटुंबातील लवण्या यांनी पहलगाममध्ये नेमकं काय घडलं आणि त्यांचा जीव नेमका कसा वाचला? याची माहिती दिली आहे. लावण्या या कोची येथील रहिवासी आहेत. ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी लावण्या तसेच त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्य पहलगाम येथे जाणार होते. या कुटुंबात लावण्या, त्यांचे पती एल्बी जॉर्ज, त्यांची तीन मुलं, सासू-सून तसेच अन्य सदस्यांचा समावेश होता.
आम्ही एकूण दोन दिवसांच्या ट्रिपचे आयोजन केले होते. कारण आम्ही पहलगाम पाहण्यासाठी जास्त वेळ देणार होतो. आम्ही वर जात होतो. आमच्यापासून पहलगाम फक्त दोन किलोमिटर अंतराव र होता. आम्ही एका ढाब्यावर दुपारचे जेवण करण्यासाठी थांबलो. याच कारणामुळे आमचा जीव वाचला. आम्ही जेवायला गेल्यानंतर ढाब्यावाल्याल मटर रोगन जोश तयार करायला सांगितले होते. पण त्याने हा पदार्थ तयार करताना जास्त मिठ टाकले होते. आम्ही त्याला याबाबत माहिती दिल्यानंतर त्याने लगेच हा पदार्थ नव्याने बनवण्याचे ठरवले आणि आम्हाला थांबण्याची विनंती केली. विशेष म्हणजे माझ्या नवऱ्यानेदेखील काहीही झालं तरी दुपारचे जेवण करुनच जाऊया, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही तिथेच जेवायला थांबलो, असं लावण्या यांनी सांगितलं.
आम्ही पुन्हा जेवायला बसल्यानंतर आमच्यापासून 10 ते 12 घोडे धावताना आम्हाला दिसले. आम्हाला वाटले की भूस्खलन झाले असेल. पण नंतर आम्हाला तिकडून येणाऱ्या लोकांनी वर जाऊ नका असे सांगितले. थोड्या वेळाने बातम्यांच्या माध्यमातून आम्हाला नेमकं काय घडलं? याबाबत समजलं, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मटणात मीठ जास्त झालं म्हणून त्यांचा जीव वाचला. लावण्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी ढाब्याच्या मालकाचे आभार मानले आहेत. हे कुटुंब आज केरळला परतलं आहे.