इंडिया आघाडीत सर्वात मोठी फूट, लालूंच्या आरजेडीचा डीलिमिटेशनला पाठिंबा, बैठकीपूर्वीच…

केंद्र सरकारने आणलेल्या डीलिमिटेशन विधेयकाला इंडिया आघाडीतील प्रमुख घटक आरजेडीने पाठिंबा जाहीर केला आहे. लालूंच्या आरजेडीच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच आरजेडीने घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

इंडिया आघाडीत सर्वात मोठी फूट, लालूंच्या आरजेडीचा डीलिमिटेशनला पाठिंबा, बैठकीपूर्वीच...
tejasvi yadav
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 3:56 PM

डीलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. आज केंद्रीय कॅबिनेटने या विधेयकाला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षातील काही पक्षांनी विरोध केला आहे. तर काही पक्षांनी अटींवर पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, इंडिया आघाडीतील सर्वात विश्वासू मित्र असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचं थेटच म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्या इंडिया आघाडीची बैठक होण्यापूर्वीच या विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट पडल्याचंही स्पष्ट झालं आहे.

आरजेडीचे खासदार सुरेंद्र प्रसाद यादव यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन डीलिमिटेशन विधेयकाचं समर्थन केलं आहे. वाढती लोकसंख्या आणि विकासाचा वाढता दबाव पाहता परिसीमन झालं पाहिजे, असं सुरेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

Loading...

लोकसभेच्या जागा वाढणार असतील तर त्याने जनता आणि लोकप्रतिनिधींचा फायदाच होणार आहे. देश आणि जगात लोकसंख्या वाढत आहे. अशावेळी विकास आणि क्षेत्रफळाच्या हिशोबाने मोठा दबाव वाढला आहे. लोकसंख्या वाढण्यासोबतच संसाधने आणि विकास कार्याचा बोजही वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात परिसीमन झालं पाहिजे, असं सुरेंद्र यादव यांचं म्हणणं आहे.

आधीपासूनच तयारी करावी लागते

2027मध्ये जेव्हा लोकसंख्या वाढण्याचे मुद्दे येतील, तेव्हा अचानक काय केलं जाईल? त्यामुळेच कोणत्याही कामासाठी आधी तयारी करावी लागते. जर परिसीमनची तयारी आतापासून नाही झाली तर नंतर अडचणी येतील. त्यामुळे आता परिसीमन झालं पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या कार्यक्षेत्रात काम करण्याची अधिक संधी मिळेल आणि जनतेलाही विकासाचा अधिक लाभ मिळेल. असंही यादव यांनी स्पष्ट केलं.

लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व

लोकसभेच्या जागा वाढवल्या पाहिजे का? असा सवाल केला असता, आम्ही त्याच्या बाजूने आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व वाढवलं पाहिजे. जनतेच्या समस्या संसदेत चांगल्या पद्धतीने उपस्थित करण्यास त्याने वाव मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

येत्या निवडणुकीत कुणाला मतदान करणार? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मतदान हे गुप्त असतं. मोदी, अमित शाह वा सम्राट चौधरी यांनाही तुम्ही कुणाला मतदान करणार असं कोणी विचारत नाही. मतदानाच्यावेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमुळे त्याची माहिती मिळते, असं त्यांनी सांगितलं.

उद्या बैठक, आज धक्का

दरम्यान, डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायचा की नाही? याची रणनीती ठरवण्यासाठी उद्या शनिवारी सकाळी 11.30 वाजता दिल्लीत इंडिया आघाडीने बैठक बोलावली आहे. त्यापूर्वीच आरजेडीने आपली भूमिका जाहीर केल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर, दुसरीकडे शरद पवारांचा गट या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us